esakal | प्रलंबित अहवालांमुळे वाढतोय संसर्ग; संशयित सर्रास रस्त्यावर 

बोलून बातमी शोधा

corona test}

जानेवारीअखेर नियंत्रणात असलेला कोरोना संसर्ग फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा तीव्र झाला आहे. अचानक वाढू लागलेल्या रुग्णांमुळे आता जळगाव महापालिकेतील कोरोना चाचणी केंद्रासह जिल्ह्यातील केंद्रांवर चाचणीसाठी येणाऱ्या संशयितांची संख्याही वाढली आहे.

प्रलंबित अहवालांमुळे वाढतोय संसर्ग; संशयित सर्रास रस्त्यावर 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होतेय. त्यामुळे संशयित रुग्णांची तपासणी वाढली असून, स्वॅबचे नमुने दिल्यानंतर अहवाल येण्यास उशीर होत असल्याने संसर्गाचा धोका अधिकच वाढतोय. शिवाय, अहवाल प्रलंबित असलेले संशयित रुग्ण सर्रास रस्त्यावर फिरत असून, त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. जानेवारीअखेर नियंत्रणात असलेला कोरोना संसर्ग फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा तीव्र झाला आहे. अचानक वाढू लागलेल्या रुग्णांमुळे आता जळगाव महापालिकेतील कोरोना चाचणी केंद्रासह जिल्ह्यातील केंद्रांवर चाचणीसाठी येणाऱ्या संशयितांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे प्रयोगशाळेवरील भारही दिवसेंदिवस वाढत आहे. 

रोज तीन हजारांवर नमुने 
जळगाव जिल्ह्यात सर्व तालुका स्तरावर नमुने संकलित करण्याची सुविधा आहे. जळगाव महापालिकेकडून शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत संकलन केंद्र असून, त्याठिकाणी रोज तीन-चारशे नमुने संकलित केले जातात. तर संपूर्ण जिल्ह्यातून रोज तीन हजारांवर नमुने प्राप्त होत आहेत. 

तपासणीवर परिणाम 
एवढ्या मोठ्या संख्येने नमुने येत असताना त्या तुलनेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी प्रयोगशाळेतील तपासणी क्षमता मर्यादित आहे. शासकीय महाविद्यालयात दिवसभरात सरासरी एक हजार नमुने तपासले जातात, तर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत दिवसाला तीनशे तपासण्या होतात, तर उर्वरित ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून तपासून घेतले जातात. 

अहवालांना विलंब 
या तिन्ही यंत्रणांकडील तपासणी क्षमता सध्याच्या स्थितीत कमी पडत असून, त्यामुळे रोज तीन हजारांवर अहवाल प्रलंबित राहत आहेत. काही अहवालांना तर चार-पाच दिवस लागत असल्याने तोपर्यंत कोरोना संशयित रुग्ण सर्रास रस्त्यावर फिरून, समाजात मिसळत असल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त होण्यास चार-पाच दिवस लागत आहे. 
 
रुग्णांचा संताप, यंत्रणेला ताप 
महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये रोज तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच अहवाल प्राप्त होण्यास उशीर लागत असल्याने रुग्णांचा संताप होत असून, ते महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारत आहेत. शिवाय, याठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणाही नसल्याने जीव धोक्यात घालून रुग्णांचे नमुने संकलित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ होऊन तणावही निर्माण होत आहे. अशा स्थितीत कोविड सेंटरला अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करावे, अशी मागणी डॉक्टर, कर्मचाऱ्यांकडून होत आहे.