वाढत्या संसर्गाने जळगाव जिल्ह्यात पुन्हा ‘अलर्ट’; नियमावली लागू 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

चार महिन्यांपासून नियंत्रणात असलेला कोरोना फेब्रुवारीच्या सुरवातीपासून डोके वर काढू लागला आहे. चार महिन्यांपासून नागरिकांमध्ये कमालीची हलगर्जी दिसून येत असून त्याचा परिणाम कोरोना रुग्णवाढीत होत आहे. 

जळगाव : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा ‘अलर्ट’ जारी केला आहे. बाजारपेठ, व्यापारी संकुले, शाळा- महाविद्यालयांसह गर्दीच्या ठिकाणी निर्बंध जारी करतानाच रुग्ण, त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिले. 
चार महिन्यांपासून नियंत्रणात असलेला कोरोना फेब्रुवारीच्या सुरवातीपासून डोके वर काढू लागला आहे. चार महिन्यांपासून नागरिकांमध्ये कमालीची हलगर्जी दिसून येत असून त्याचा परिणाम कोरोना रुग्णवाढीत होत आहे. 

पुन्हा कडक निर्बंध 
त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारपासूनच प्रमुख अधिकारी, यंत्रणांचे प्रमुख यांच्याशी बैठकांद्वारे चर्चा सुरु केली आहे. आजही महापालिकेत आयुक्त सतीश कुळकर्णी, व्यापारी संघटनांसह मंगल कार्यालये, हॉटेल्स असोसिएशन आदी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सूचना केल्या. कोरोनासंबंधी शासनाने घालून दिलेले दिशानिर्देश काटेकोरपणे पाळावे, या सूचनेसह काही निर्बंधही घालून दिले. त्यासंबंधी सायंकाळी आदेशही जारी केलेत. 
 
प्रशासन, यंत्रणेसाठी आदेश 
- कोविडसाठी वापर करण्यात आलेल्या इमारतींची तपासणी करुन त्यात आवश्‍यक साहित्य, यंत्रणा कुठल्याही क्षणी वापरता येईल, अशा स्थितीत सज्ज ठेवणे 
- डॉक्टरांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या लक्षणांवरुन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे 
- लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी घेणे अनिवार्य करणे व त्यावर लक्ष ठेवणे 
- रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करुन घेणे, संपर्कातील किमान २० व्यक्तींची तपासणी आवश्‍यक 
- एखाद्या परिसरात रुग्ण वाढत असल्याचे लक्षात आल्यावर प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करुन, त्याबाबतचे सर्व नियम पाळणे 
 
गर्दी नियंत्रणासाठी आदेश 
- लग्नसोहळे, समारंभ, अंत्यविधीसाठी गर्दीवर नियंत्रण. लग्नात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही. तसे आढळल्यास जबाबदारी निश्‍चित करुन पोलिसांच्या मदतीने कारवाई करणे 
- अशा कार्यक्रम, सोहळ्यांसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस ठाण्याची पूर्व परवानगी आवश्‍यक 
- हॉटेल्स, उपहारगृह, बार, कॅफे, क्लब, रिसोर्ट केवळ ५० टक्के क्षमतेसह सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंतच खुली राहतील 
- शाळा, महाविद्यालयांत तसेच खासगी क्लासेसमध्ये सर्व स्टाफ, विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचा वापर आवश्‍यक. विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध ठेवणे, संशयित विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे 
- भाजीपाला मार्केट, व्यापारी संकुले, मॉलच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर अनिवार्य. दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर उपलब्ध असावे 
- शासकीय कार्यालयांमध्येही अशा प्रकारचे सर्व नियम आवश्‍यक 
- मास्क न वापरणाऱ्यांविरोधात प्रत्येकी ५०० रुपये दंड, आणि प्रसंगी गुन्हे दाखल करणे 
- सार्वजनिक उद्याने सकाळी ५ ते ९ यावेळेतच व्यायाम, मॉर्निंग वॉकसाठी खुली राहतील, अन्य वेळेत बंद. 
- एसटी, ट्रॅव्हल्स, खासगी प्रवासी वाहतूक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविण्यास बंदी. अन्यथा दंडात्मक व गुन्ह्याची कारवाई होणार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus alert in jalgaon district new rules collector