esakal | रक्ताचे नाते दुरावले, अश्रूही आटले..आता उरले काय; कोरोना महामारीचे भयावह वास्तव
sakal

बोलून बातमी शोधा

blood relation

रक्ताचे नाते दुरावले, अश्रूही आटले..आता उरले काय; कोरोना महामारीचे भयावह वास्तव

sakal_logo
By
किशोर पाटील

वावडे (ता. अमळनेर) : दररोज सर्वत्र किंचाळ्या ऐकायला येऊ लागल्यात, आज हा गेला, तमका गेला याची चर्चा कानावर पडत आहे. शेकडो कुटुंब उघड्यावर पडले. अनेकांच्या घरातील दिवे विझले. प्रत्येकाच्या मनात मृत्यूचे भय आहे. या संकटात पद, पैसा, नातलग, ओळख सारे निरर्थक ठरत आहे. संसर्गाच्या भीतीपोटी रक्ताचे नाते हे एकमेकांपासून दुरावत आहे. पूर्ण पुढे हतबल झालेला प्रत्येक जण जगण्यासाठी धडपडत आहे.

कोरोना काळात जीव सुरक्षित तर सर्वकाही आहे, यानुसार सर्वांनी आपली जीवनशैली सुरू केल्याची दिसत आहे. कधी नव्हे असे विदारक दृश्य अनेक जण अनुभवत आहेत. महामारीच्या संकटात कोणाचे छत्र हरवले, तर कुणाचा आधार गेला, मुले पोरगी झाली, घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे शेकडो कुटुंब उघड्यावर पडले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली. आता रुग्णालयांमध्ये बेड, औषध, ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे सर्वत्र अस्वस्थता व मानसिक तणाव वाढला आहे. संसर्गाचे भीतीपोटी रक्ताचे नातेही एकमेकांपासून दूरच राहत आहे.

कुटुंब हतबल

आज प्रत्येकाच्या आजूबाजूला संक्रमित रुग्ण असल्यामुळे जणू आपल्या दारातच कोरोना रुपी यमदूत उभा असल्याची प्रचिती येत आहे. प्रत्येक जण कोरोनापासून वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. अंत्यसंस्कारासाठी गर्दी होत आहे. मृतदेहाची दहन करायलाही जागा मिळत नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी ही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. मृतदेहाची विल्हेवाट प्रशासन स्तरावर करण्यात येत असल्यामुळे आप्तेष्टांना दर्शनाला मुकावे लागत आहे. पूर्वापार करण्यात येणाऱ्या धार्मिक विधी ही करणे अशक्य झाले आहे, अशी भयावह स्थिती कोरोनामुळे अनुभवायला मिळत आहे. घरात एकापेक्षा अधिक सदस्य संक्रमित होत असल्यामुळे अख्खे कुटुंब हतबल झाले आहे.

अन् बातमी लपवण्याची वेळ

रुग्णालयात भरती असलेल्या पतीला पत्नी गेल्याचे, तर पत्नीला पती मृत पावल्याची माहिती सुद्धा लपवून ठेवावी लागत आहे. त्यांना धक्का बसू नये; म्हणून मुले परस्पर अंत्यसंस्कार उरकत आहेत. या महामारीत कित्येक महिलांवर काळाने घाला घातला आहे. तरुणपणातच अनेक विधवा झाल्या आहेत. आई- वडिलांच्या मृत्यूमुळे बालपणीच मुलांचे छत्र हरवले आहे. याप्रमाणेच कोरोनाचा फटका तरुणाईलाही बसत आहे. अनेकांचे विवाहसोहळे लांबले आहेत तर संक्रमित झालेल्या काहींचे लग्नही मोडले आहेत.

सावरण्याचा सल्ला

प्रत्यक्ष भेटता येत नसल्यामुळे मोबाईलवरच स्वकियांच्या प्रकृतीची विचारपूस करीत आहेत. घराच्या आजूबाजूला गावोगावी संक्रमणामुळे परिस्थिती बिकट असून, सर्वत्र मृत्यूची बातमी ऐकून अस्वस्थ असलेल्या प्रत्येकाला मोबाईल खणखणताच धडकी भरत आहे. समोरच्या व्यक्तीने प्रकृतीबाबत विचारणा केल्यास मानसिक समाधानही होत आहे. सोशल मीडिया व्हॉट्सअपवर नातेवाईक व मित्रमंडळींना अवांतर बोलण्याएवजी स्वतःला कुटुंबाची काळजी घ्या, असा सल्ला दिला जात आहे.

संपादन- राजेश सोनवणे

loading image