
महसूल, पोलिस, पालिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रयत्न केले. नगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनी कोरोनाबाबत जनजागृती करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
एरंडोल (जळगाव) : कोरोनाचे संकट कायम असताना देखील नागरिक कोरोनासाराख्या आजाराकडे दुर्लक्ष करीत असून, मास्क न वापरता बिनधास्तपणे फिरत आहेत. विवाह सोहळा आणि सार्वजनिक कार्यक्रमात नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असून, आठवडे बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. प्रांताधिकारी कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शहरातील कोरोनाचे संकट वाढले आहे.
शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासकीय पातळीवरून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रांताधिकारी विनय गोसावी, तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांच्यासह महसूल, पोलिस, पालिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रयत्न केले. नगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनी कोरोनाबाबत जनजागृती करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
अचानक आकडा वाढतोय
शहरात कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना अचानक रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. प्रांताधिकारी कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मात्र, कोरोनाचे संकट टळले नसताना देखील नागरिक कोणतीही काळजी न घेता बिनधास्तपणे फिरत आहेत. विवाह सोहळा, सार्वजनिक कार्यक्रम याठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत असून, नागरिक विनामास्क बिनधास्तपणे कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत. शहरात दर रविवारी आठवडे बाजार भारत असतो. मात्र, बाजारात विक्रेते मास्क न लावता दुकाने लावत आहेत तसेच नागरिक विशेषतः महिला कोणतीही काळजी न घेता विनामास्क बाजारात गर्दी करून वस्तूंची खरेदी करीत आहेत. पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, तसेच शासकीय यंत्रणांनी देखील विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे