
कोरोनाचा दुसरा विषाणूचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. यामुळे आता विदेशातून आलेल्या नागरीकांची तपासणी केली जात आहे. यात जळगावात काही दिवसांपुर्वी यु.के.हून नागरीक आले होते. यामुळे जळगावात धोका उद्भवतो की काय याबाबत चिंता होती. मात्र त्यांच्या अहवालानंतर जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव : ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणू आढळल्याने देशासह राज्यात, जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांना मुंबई, पुणे विमानतळावरच क्वारंटाइन केले जात आहे. गेल्या २०- २२ दिवसांपूर्वी यू.के.मधून सात नागरिक जळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्या नागरिकांची कोरोना चाचणी ‘निगेटीव्ह’ आली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. सी. चव्हाण यांनी सांगितले, की जळगाव जिल्ह्यात २०-२२ दिवसांपूर्वी यूकेतून सात जण आले होते. त्यांची कोरेाना चाचणी करण्याबाबत आदेश आले होते. आरोग्य यंत्रणेने संबंधितांची त्यांची घरी जावून कोरोना चाचणी घेतली. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यांना आठ दिवस घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यु.के.मधून भुसावळमधील चार, चाळीसगावमधील दोन, जळगावमधील एक नागरिक आले होते.
संपादन ः राजेश सोनवणे