कोरोनाची ‘पॉझिटिव्हीटी’ ६ टक्क्यांवर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे आकड्यांवरुन दिसून येते. अर्थात, यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा जळगाव शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे.

जळगाव : कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्या असून चाचण्यांच्या तुलनेत आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र काही दिवसांपासून समोर येत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून पॉझिटिव्हीटी रेट ६ टक्क्यांपेक्षा अधिक झाला असून रविवारी नव्याने ४१ रुग्ण आढळून आले. 
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे आकड्यांवरुन दिसून येते. अर्थात, यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा जळगाव शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. रविवारीही जिल्ह्यात आढळून आलेल्या ४१ रुग्णांमध्ये तब्बल २७ रुग्ण एकट्या जळगाव शहरातील आहेत. विशेष म्हणजे चाचण्या कमी होऊनही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसते. रविवारी केवळ साडेसातशे चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. 

एका रूग्‍णाचा मृत्‍यू
आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५६ हजार ३१८वर पोचली आहे. रविवारी दिसभरात ४४ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ४९० झाला आहे. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून जळगाव शहरातील ४० वर्षीय महिलेला कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. त्यामुळे बळींची संख्याही १३३८ झाली आहे. रविवारी जळगाव शहरात २७, जळगाव ग्रामीण, यावल येथे प्रत्येकी १, भुसावळ २, जामनेर ५, मुक्ताईनगर २ असे रुग्ण आढळले. नऊ तालुके निरंक राहिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus update one death