
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. नवीन बाधितांचा आकडा पाहता आता चिंताजनक स्थिती वाटत नाही. अर्थात कोरोनाची भिती नागरीकांच्या मनातून निघालेली जाणवत आहे.
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना व्हायरस वाढण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. रोज नवीन रूग्णांची संख्या ही सरासरी ३० ते ४० असून, तुलनेत बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या देखील बरी आहे. विशेष म्हणजे आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील सात तालुके निरंक आले असून, दिवसभरात ३७ नवीन बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. नवीन बाधितांचा आकडा पाहता आता चिंताजनक स्थिती वाटत नाही. अर्थात कोरोनाची भिती नागरीकांच्या मनातून निघालेली जाणवत आहे. यामुळेच की काय मार्केटमध्ये फिरताना तोंडाला मास्क लावून जाणारे क्वचितच दिसून येत आहे. अशा प्रकारे गाफील राहूण चालणार नसून काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दोघांचा मृत्यू
आज आलेल्या कोरोना अहवालाप्रमाणे जिल्ह्यात एकुण ३७ नवीन बाधित आढळले असून, आतापर्यंत ५६ हजार ७२८ बाधित रूग्ण झाले आलेत. सद्यस्थितीला बाधितांमधील ४८८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ५४ हजार ८९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयातर्फे देण्यात आली आहे.
असे आढळले रूग्ण
जळगाव शहर १३, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ८, अमळनेर २, चोपडा १, यावल २, जामनेर २, रावेर ५, चाळीसगाव २ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ३७ बाधित रूग्ण आढळले आहे. तर पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड निरंक आहेत.
१३६३ कर्मचाऱ्यांना लस
कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत असून, आज ५२३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील सात केंद्रावर १ हजार ३६३ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.