जळगाव जिल्ह्यात १४ ठिकाणी कोविड लस देणार 

देवीदास वाणी
Monday, 11 January 2021

आठ जानेवारीस लसीकरणाबाबत जिल्ह्यात चार ठिकाणी शंभर जणांवर ‘ड्राय रन’ झाला. त्यातून एका केंद्रावर किती कर्मचारी लागतील, काय काय अडचणी असू शकतात याची माहिती जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेला झाली आहे.

जळगाव : केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणाचे आदेश दिल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणांतर्फे लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात १४ ठिकाणी लसीकरण करण्यात येईल त्या ठिकाणाची नावे जिल्हा रुग्णालय व महापालिका प्रशासनाने शासनाकडे सादर केली आहेत. कोविड लसीकरण आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांना अगोदर दिले आहे. सुमारे सोळा कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार आहे. 
कोरोना महामारीने सर्वच जगाला ग्रासले आहे. त्यावर उपाय म्हणून कोविड लसीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलिओ लसीकरणाप्रमाणे हे लसीकरण असेल. आठ जानेवारीस लसीकरणाबाबत जिल्ह्यात चार ठिकाणी शंभर जणांवर ‘ड्राय रन’ झाला. त्यातून एका केंद्रावर किती कर्मचारी लागतील, काय काय अडचणी असू शकतात याची माहिती जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेला झाली आहे. लसीकरणाबाबत १४ ठिकाणची नावे शासनाने कळविण्यास सांगितली होती. त्याप्रमाणे १४ ठिकाणांची नावे लसीकरणासाठी देण्यात आली आहेत. 

लसीकरणाबाबत मार्गदर्शन येणार 
व्हॅक्सिन आल्यानंतर प्रत्यक्षात लस कशी द्यावयाची, एका दिवशी एका केंद्रावर किती जणांना लस द्यावयाची? स्टाफ कसा ठेवायचा, याबाबतचे मार्गदर्शन आरोग्य मंत्रालयाकडून येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाचा आराखडा तयार होईल. 
 
अशी आहेत १४ ठिकाणे 
जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालय, जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव येथील तिन्ही उपजिल्हा रुग्णालये, जळगाव, चोपडा, भुसावळ, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, रावेर, पिंपळगाव हरेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालये, जळगाव महापालिका हद्दीतील नानीबाई हॉस्पिटल, डी. बी. जैन हॉस्पिटल अशा ठिकाणची नावे शासनाकडे पाठविली आहेत. 

शासनाने १४ ठिकाणाची नावे कळविण्यास सांगितली होती. त्यानुसार नावे कळविण्यात आली आहेत. अजून लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. लशीही आलेल्या नाहीत. त्या लवकरच येतील. १६ पासून कोरोना लसीकरण आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

– डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus vaccine 14 spot final in destrict