esakal | ‘आर आर बीटी’च्या नावाने बोगस बियाण्याची होतेय विक्री

बोलून बातमी शोधा

cotton seeds
‘आर आर बीटी’च्या नावाने बोगस बियाण्याची होतेय विक्री
sakal_logo
By
टिम इ सकाळ

चोपडा (जळगाव) : मागील चार वर्षापासून आर आर बीटी, बीटी थ्रीजी व बीटी फोरजीच्या नावाने शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रकार वाढला आहे. जिल्ह्यात आर आर बीटीच्या नावाने कापसाच्या बोगस बियाण्याची सर्रास विक्री सुरू आहे. याकडे कृषी विभागाने वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे.

जिल्हा कृषी विभागाने दरवर्षी नावापुरत्या एक- दोन विक्रेत्यांवर कारवाई करायची व नंतर हात बांधून गंमत बघायची एवढेच काम करीत असल्याने शेतकरी नाडला जात आहे. याकडे वेळीच लक्ष घालण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांना बियाण्याचे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरत आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या विचार न करता बीटी २ या बियाण्याचे दरवाढ केली कोणत्याही कंपनीचे बिटी बियाणे लागवड केली; तरीही गुलाबी बोंड अळी ही येतंच आहे.

शेतकऱ्यांना गंडविण्याचा प्रकार

बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले असते, तर शेतकऱ्यांनी बियाणे दरवाढ समजून घेतली असती. मागील चार वर्षापासून बऱ्याच कंपन्यांनी विशेष करून गुजरातमधून बिना सर्टिफाइड कापूस बियाणे कापडी पिशव्या पॅकिंग करून आर आर बीटी, थ्री- जी बीटी व फोर जी बीटी नावाने शेतकऱ्यांना गंडवण्याचे प्रकार चालू केले आहे. बरेच बियाणे विक्रेत्‍यांनी शेतकऱ्यांना अधिक नफ्या पोटी दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री करत आहेत. या बोगस बियाणे लागवड केल्याने परिणामी शेतकऱ्यांना उत्पन्न येत नाही व शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. अशा प्रकारामुळे बरेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पन्न न आल्यामुळे आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत.

तर विक्रेत्‍याची गाढवावर बसून मिरवणुक

बियाणे कंपन्या व विक्रेते यांचे साटेलोटे असल्याने या गोष्टीचा त्यांच्यावर काहीच परिणाम होतांना दिसत नाही. यावर्षी मात्र शेतकऱ्यांना आर आर बीटी, थ्री जी बीटी, फोर जी बीटी या नावाने बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर जिल्हा कृषी विभागाने वेळीच कारवाई करावी; अन्यथा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य स्वतः बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्याला गाढवावर बसून गळ्यात चपलांचा हार टाकून कृषी विभागा यांच्या कार्यालयावर आणतील असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांनी दिला आहे.

कारवाई नावालाच

जिल्हा कृषी विभागाने दरवर्षी नावापुरत्या एक- दोन विक्रेत्यांवर कारवाई करायची व नंतर हात बांधून गंमत बघायची एवढेच काम केले आहे. मात्र यापुढे असे व्हायला नको याची दखल घ्यावी. असे न झाल्यास शेतकरी संघटना काय करू शकते ते यापुढे होणाऱ्या परिणामांवर अवलंबून असणार आहे.

सध्या बीटी कापूस बियाणे उत्पादक किती कंपन्या आहेत, हाही मोठा प्रश्न आहे. एखाद्या वाणावर शासनाने बंदी घातली की, कंपनी तेच बियाणे दुसऱ्या नावाने बाजारात आणत आहेत. यावर कोणाचाही अंकुश नाही. तसेच कीडनाशके उत्पादक कंपन्यासुद्धा आपले उत्पादन मनमानी प्रमाणे बाजारात विकत आहेत.

- किरण गुजर, जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना, जळगाव