
१०० कोटींची जमीन कवडीमोल दरात घेतल्याच्या तक्रारीबात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अपर महसूल सचिवांनीही प्रकरणाची दखल घेतल्याने झंवरच्या अडचणी वाढल्या आहेत.
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात प्रमुख सूत्रधार सुनील झंवर महिनाभरापासून फरारी आहे. दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी झंवरचा मुलगा सूरजला अटक केल्यामुळे खळबळ उडाली.
दरम्यान, सुनील झंवरने नाशिकच्या मांडसांगवी येथील १०० कोटींची जमीन कवडीमोल दरात घेतल्याच्या तक्रारीबात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अपर महसूल सचिवांनीही प्रकरणाची दखल घेतल्याने झंवरच्या अडचणी वाढल्या आहेत. बीएचआर पतसंस्थेत तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवरने ठेव पावत्यांचे मॅचिंग, संस्थेच्या मालमत्तांची कवडीमोल दरात विक्री व खरेदी असे व्यवहार करुन कोट्यवधींचा अपहार केला. गेल्या महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी करताना दोघा सीएंसह चौघांना अटक केली. मात्र, कंडारे व झंवर तेव्हापासून फरारी आहेत.
पथक जळगावातच
एकीकडे झंवर महिनाभरापासून फरारी असून, तो पोलिसांना सापडत नाही. मध्यंतरी तो जळगावात येऊन गेल्याची तसेच, अटक न होण्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगली होती. असे असताना आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जळगावात तपासासाठी आले होते. अखेरीस या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सूरज झंवरला त्याच्या निवासस्थानावरुन अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीए जैनांचा जामीन फेटाळला
दरम्यान, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले सीए महावीर जैन यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अन्य संशयित सीए धरम सांखला, विवेक ठाकरे व सुजीत वाणी यांच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी (ता. २७) सुनावणी होणार आहे.
संपादन ः राजेश सोनवणे