esakal | रात्रीच्या गस्‍तीवरील पोलिसाच्या नजरेत आला अन्‌ उघड झाला प्रकार

बोलून बातमी शोधा

cow robbery
रात्रीच्या गस्‍तीवरील पोलिसाच्या नजरेत आला अन्‌ उघड झाला प्रकार
sakal_logo
By
टिम इ सकाळ

मेहुणबारे (जळगाव) : गेल्या अनेक दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यातुन पशुधन चोरीचे प्रकार वाढले असतांना शनिवारी (ता.१) पहाटे दिडच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीसांना गाय चोरून नेतांना एकजण आढळून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून गायीसह ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गाय मालकाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्यांचेकडून पशुधन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्यापारी सद्दाम खान उस्मान खान या व्यापाऱ्याने त्याची १७ हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची गाय येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बांधलेली होती. शुक्रवारी (ता. ३०) खान हे गायीला चारापाणी करून घरी गेले. दरम्‍यान शनिवारी सकाळी ७ वाजता ते गायीला चारा पाणी करण्यासाठी गेले असता खुंट्यावर गाय दिसून आली नाही. त्यांनी परिसरात गायीचा शोध घेतला असता मिळून न आल्याने व्यापाऱ्याने शहर पोलीसात धाव घेतली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गस्ती पथकाच्या हाती संशयित गायचोर

दरम्यान पहाटे दीड वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे गस्ती पथकातील प्रशांत पाटील, चतरसिंग महेर, अमोल भोसले हे गस्त घालत असताना एक संशयित इसम शेख नदीम शेख युसूफ (वय २७, रा. मालेगाव) यास गायीसह कन्नड बायपास जवळील हॉटेल जवळून जातांना मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून गाय चोरल्याची कबुली दिली आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. तपास एएसआय अनिल अहीरे हे करीत आहेत. यापूर्वी चाळीसगाव परिसरात काही गुरे चोरीच गुन्हे पोलीसात दाखल झाले आहेत. त्या चोरीशी शेख नदीम याचा काही संबंध आहे काय याचा शोध पोलीस घेत आहेत.

पशुधनचे मांस मालेगाव, औरंगाबादकडे

दरम्यान सध्या लॉकडाऊन असल्याने जवळपास व्यवहार ठप्प आहे. मात्र याकाळात मोठ्या प्रमाणात तालुक्‍यात पशुधन चोरीचे प्रकार वाढले आहेत. गुराढोरांचा बाजार बंद असतांना देखील हे चोरीचे गुरे कुठे जातात हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चाळीसगाव येथे काही भुरटे चोर ही गुरे चोरून कत्तलखान्यात तर घेऊन जात नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय या गुरांची चाळीसगाव येथे कत्तल करून त्यांचे मांस मालेगाव, औरंगाबाद येथे पाठवले जात असल्याची चर्चा आहे पोलिसांनी गुरे चोरांच्या टोळीचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी शेतकरी व पशुधन मालक करीत आहेत.