
काही दिवसांपूर्वी जळगाव पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या काही महिलांना पकडले होते. त्यांची जळगावच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्यानंतर चौकशी दरम्यान तरूणीबाबतचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
चाळीसगाव (जळगाव) : येथील दर्गा परिसरात आपल्या आईसोबत राहून फुगे विकणाऱ्या १७ वर्षीय तरुणीवर दोघा नराधमांनी तरुणीच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. या प्रकरणी शहर पोलिसात दोघा अज्ञात नराधमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी जळगाव पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या काही महिलांना पकडले होते. त्यांची जळगावच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्यानंतर चौकशी दरम्यान, त्यातील एक तरुणी गर्भवती असल्याचे समोर आले. बालकल्याण समितीने या तरुणीची विचारपूस केल्यानंतर दोघांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला.
मध्यरात्री दोघे आले, चाकूचा धाक दाखवत..
पीडीत तरुणीने बालकल्याण समितीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे, सुमारे पाच महिन्यांपूर्वी ती तिच्या आईसह चाळीसगाव शहरात फुगे विकण्यासाठी आलेली होती. दिवसभर फुगे विकल्यानंतर रात्री उशिर झाल्याने शहरातील बामोशी बाबांच्या दर्गा परिसरातील मोकळ्या जागेवर मायलेक झोपल्या. मध्यरात्रीच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती ज्यापैकी एकाची मोठी दाढी व गुडघ्यापर्यंतचा सदरा होता. (नाव, गाव, पत्ता माहीत नाही) या पीडित तरुणीजवळ आले व तिला झोपेतून उठवून ‘तू जर आमच्यासोबत आली नाही तर तुझ्या आईला चाकूने ठार मारू’ अशी धमकी दिली व पीडित तरुणीला दर्ग्यापासून लांब अंतरावर घेऊन जाऊन त्यातील एका नराधमाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
अन् ती पाच महिन्याची गर्भवती
सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्या आईला ठार मारू, अशी धमकी संबंधीत दोघांनी तरूणीला दिली. संबंधित पीडित तरुणीसोबत बळजबरीने शारीरीक संबंध केल्यामुळे ती तरूणी गर्भवती राहिली. बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी पीडितेची चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
बालकल्याण समितीने नोंदविलेला जबाब शहर पोलिसांना शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी उशिरा प्राप्त झाल्यानंतर पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोघा अनोळखी नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक निसार शेख तपास करीत आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे