रात्री बाप लेकाने केला पाठलाग; चोरट्यांना पकडले अन्‌ सुरू झाली झटापट

रईस शेख
Tuesday, 23 February 2021

रात्री जेवणानंतर साडेअकराच्या सुमारास कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपायला गेले. मुलगा नदीम नेहमीप्रमाणे गच्चीवर झोपला. साधारणत: अडीचच्या सुमारास खालच्या दाराचा कडीकोयंडा तोडण्याचा आवाज आल्याने नदीमला जाग आली.

जळगाव : शिवाजीनगर हुडकोत कुटुंबीय वरच्या खोलीत झोपले असताना खालील बंद घर चार चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. कडीकोयंडा तोडल्यानंतर बाप-लेकास जाग आल्याने चोरट्यांची योजना फसली. पाठलाग करून दोघांना पकडण्यात आले असून, इतर दोघे फरारी झाले आहेत. 
शिवाजीनगर हुडकोत मेहमूदखान चाँदखान पठाण (वय ५२) दुमजली घरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रात्री जेवणानंतर साडेअकराच्या सुमारास कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपायला गेले. मुलगा नदीम नेहमीप्रमाणे गच्चीवर झोपला. साधारणत: अडीचच्या सुमारास खालच्या दाराचा कडीकोयंडा तोडण्याचा आवाज आल्याने नदीमला जाग आली. त्याने वडिलांना उठविले. बाप-लेक दबक्या पावलांनी जिन्यावरून येत असताना, जिन्यात दोन चोरटे बसून होते, तर त्याचे साथीदार घर झडती घेत होते. 

लाईट लावला अन्‌ उडाली धांदल
मेहमूद खान यांनी जिन्याचा लाइट लावताच चोरट्यांची धांदल उडाली. चोरी सोडून चोर पळत सुटले, त्यांच्या मागावर मेहमूद व नदीम पळत सुटल्यावर दोन चोरांना पकडले. मेहमूद खान व मुलगा नदीम अशा दोघांनी स्वतःच्या जिवाची परवा न करता पळून जाणाऱ्या किरण अनिल बाविस्कर व सिद्धार्थ राजू तायडे अशा दोघांवर झडप घालतच पकडले. झटापट झाली, चोरट्यांच्या हाती शस्त्र न लागल्याने बाप-लेक सुरक्षित राहिले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news late night home robbery case