esakal | मुली, जावई, साडूसह शंभरावर लोकांची चौकशी; पोलिसांना हाती काही लागलेच नाही

बोलून बातमी शोधा

jalgaon police
मुली, जावई, साडूसह शंभरावर लोकांची चौकशी; पोलिसांना हाती काही लागलेच नाही
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : कुसुंबा खुर्दच्या ओमसाईनगरात मुरलीधर पाटील (वय ५४) व त्यांची पत्नी आशाबाई (वय ४७) यांचा गळा आवळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले होते. दोघांच्या हत्येला तब्बल ७२ तास उलटूनही पोलिस मारेकऱ्यांपर्यंत पोचू शकले नाहीत.

जळगाव-औरंगाबाद रोडवर कुसुंबा खुर्दच्या ओमसाईनगरात मुरलीधर पाटील व पत्नी अशाबाईंची बुधवारी (ता. २१) रात्री मारेकऱ्यांनी दोरीने गळा आवळून हत्या केली होती. मृत दांपत्याच्या परिचयातील आणि व्यावसायिक सहकारी दिलीप कांबळे यांची चौकशी करण्यात आली. सोबतच पाटील दांपत्याच्या जुन्या घराजवळ झालेल्या वादातील संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. मात्र, फारसे काही हाती लागलेले नाही. हत्येसाठी अशाबाई यांच्या घरात शिरलेला मारेकरी कुणीतरी परिचित व्यक्तीच असला पाहिजे असा अंदाज पोलिसांचा असून, त्या अनुषंगाने मृतांची मुलगी शीतल, स्वाती यांच्यासह दोन्ही जावई, भाऊ, साडू आदींचे जबाब घेण्यात आले आहेत.

व्याजाचा पैसा अन्‌ वाद

मृत मुरलीधर पाटील इस्टेट ब्रोकर दिलीप कांबळेंसोबत प्लॉट मोजणीचे काम करत होते. तर आशाबाई या गरजवंताची मदत म्हणून व्याजाने पैसेही देत होत्या. कडक बोलणे अन्‌ स्वभावामुळे आशाबाईंच्या नादी सहसा कुणी लागत नव्हते. त्यांच्याकडून पैसे घेतलेल्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

शंभरावर लोकांची चौकशी

मारेकऱ्यानी पाटील दांपत्याच्या हत्येनंतर दोघांचे मोबाईल, रोकडसह अंगावरील दागिनेदेखील पळविले आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची धुंडाळणी सुरू केली असून, अनेक ठिकाणचे फुटेज संकलित करून बघण्यात येत आहे. तांत्रिक तज्ज्ञांसह साध्या वेशातील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन दिवसांत शंभरावर लोकांची चौकशी करण्यात आली आहे.