बर्ड- डेचा केक कापण्यापुर्वीच हाती बेड्या; पिता-पुत्रावर जिवघेणा हल्ला

रईस शेख
Monday, 25 January 2021

शेतात सेाडून पिक नासवण्यात आले होते. त्याचा जाब विचारल्यावरुन अरुण कोळी यांना सुपडूची आई आशाबाई यांनी शिवीगाळ करून हातातील विळा मुलगा सुपडू याला देत मारण्याचे सांगितले.

जळगाव : पिंप्राळा गावठाण येथील अरुण कोळी यांच्या शेतात सुपडू ठाकूर यांचे घोडे सोडून पिकाची नासाडी करण्यात आली होती. शेतात घोडे का सोडले, याची विचारणा केल्यावरुन अरुण कोळी व त्यांच्या देान्ही मुलांवर विळा, चॉपरने हल्ला चढवून जीवेठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. गुन्ह्यातील मुख्यसुत्रधार व अट्टल गुन्हेगार मितेश जाधव याला रामानंदनगर पेालिसांनी पाळत ठेवून अटक केली. 

जखमी जितेंद्र कोळी (रा. कोळीवाडा पिंप्राळा) याच्या तक्रारीप्रमाणे, मढी चौकातील रहिवासी सुपडू ठाकूर याचे घोडे शेतात सेाडून पिक नासवण्यात आले होते. त्याचा जाब विचारल्यावरुन अरुण कोळी यांना सुपडूची आई आशाबाई यांनी शिवीगाळ करून हातातील विळा मुलगा सुपडू याला देत मारण्याचे सांगितले. सुपडूने अरुण कोळी यांना जखमी केले. मुलगा जितेंद्र व खुशाल यांनाही जखमी केले. जितेंद्र कोळी याच्या तक्रारीवरून सुपडू ठाकूर, चंदू ठाकूर, मितेश जाधव आणि आशा ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा घडल्यापासुन संशयीत मितेश जाधव फरार होता. 

अशी टिप..अशी अटक 
गुन्ह्यातील संशयीत मितेश जाधव याच्या मुलीचा आज वाढदिवस असल्याने तो, जळगावी येणार असल्याची गुप्त माहिती ठाणे अमलदार विनोद सोनवणे यांना मिळाली. निरीक्षक अनील बडगुजर यांच्यासह रविंद्र पाटील, सागर देवरे, रविंद्र चौधरी, शिवाजी धुमाळ, विजय खैरे यांच्या पथकाने थेट ममुराबाद येथून पिच्छापुरवत शिवकॉलनीत दडून बसल्यावर झडप घालत अटक केली. मुलीचा वाढदिवस असल्याने त्याच्या घरी कार्यक्रमाची तयारी झालेली असतांनाच पेालिसांनी त्याला अटक करुन नेले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news police arrested in doughter birthday