मुलगी बघायला जाणार त्‍याच रात्री झाला घात

रईस शेख
Monday, 28 December 2020

जळगाव- भुसावळदरम्यान अप रेल्वेरुळावर मृतदेह पडला असल्याची माहिती पहाटे दोनच्या सुमारास मोटरमनने स्टेशन मास्तरांना दिली. स्टेशन मास्तरने नशिराबाद पोलिसांना तसे कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला.

जळगाव : जळगाव- भुसावळ रेल्वेरुळावर नशिराबादजवळील ओरिएंट कंपनीशेजारीच २४ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. दुपारी या तरुणाची ओळख पटली असून, दीपक भगवान सपकाळे (वय २४) असे त्याचे नाव असून, तो निंभोरा-सुनोदा (ता. रावेर) गावातील रहिवासी आहे. शनिवारी (ता. २६) रात्री तो हळदीच्या कार्यक्रमासाठी पाडळसरे येथे गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याला सोबत घेऊन जाणाऱ्यांची पोलिस चौकशी करत असून, रात्री उशिरा संशयितांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
जळगाव- भुसावळदरम्यान अप रेल्वेरुळावर मृतदेह पडला असल्याची माहिती पहाटे दोनच्या सुमारास मोटरमनने स्टेशन मास्तरांना दिली. स्टेशन मास्तरने नशिराबाद पोलिसांना तसे कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला. त्या वेळी ओरिएंट सिमेंट फॅक्टरीजवळ (पोल क्र. ४३३/२४-२२) तरुणाचा मृतदेह सापडला. मृतदेहाचा एक हात कापला गेला होता, तर छातीवर, गळ्याजवळ शस्त्राने भोसकल्याप्रमाणे खुणा आढळून आल्या. पोलिसांनी मृतदेह तातडीने जिल्‍हा रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून मृतदेहाचे छायाचित्र व्हायरल करण्यात आले. त्यातून जळगाव शहरातील नातेवाइकांनी ओळख पटवून कुटुंबीयांना सांगितले. आई-वडील आणि बहिणीला जिल्‍हा रुग्णालयात दाखल असल्याचे सांगत बोलावून घेण्यात आले. नातेवाइकांनी ओळख पटवल्यावर अक्रोश केला. 
 
हळदीसाठी जाणार होता..
दीपक शेतमजुरी व वाहनचालक होता. काही वर्षे तो जळगाव येथील कांचननगर, जैनाबाद येथेही राहात होता. मित्राच्या वडिलांचा अपघात झाला, असे सांगत दीपक शनिवारी सायंकाळी घराबाहेर पडला. तेथून रात्री तो पाडसरे येथे नातेवाइकांकडे हळदीला जाणार होता. त्यामुळे तो तेथेच झोपला असावा, असे आई- वडिलांना वाटले. मात्र, सकाळी वारंवार मोबाईलवर संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही तो मोबाईल घेत नसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. 
 
मुलगी बघायला जाण्यापूर्वीच
मृत दीपक एकुलता एक हेाता. बहीण उज्ज्वला नीलेश सैंदाणे जळगावला असून, रविवारी (ता. २७) तो आई- वडिलांसह आसोदा येथे मुलगी बघण्यासाठी जाणार होता. मुलीकडची मंडळी दुपारपर्यंत त्यांची वाट पाहत असतानाच त्यांनाही दीपकच्या मृत्यूचे वृत्त समजले. त्यामुळे त्यांनीही तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली. 

रात्री अटकसत्रास सुरवात 
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, नशिराबाद प्रभारी गणेश चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरा दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल होऊन रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news railway track body murder case