esakal | रावतेंमुळे एसटी महामंडळाचे खासगीकरण अन्‌ तोटाही
sakal

बोलून बातमी शोधा

jayprakash chajjed divakar raote

एसटी गाड्यांची स्वच्छता जेव्हा कर्मचारी करीत होते; तेव्हा केवळ ३६ कोटी दरवर्षी खर्च होता. रावतेंनी खासगीकरण करून स्वच्छतेचा ठेका खासगी कंपनीला दिला. स्वच्छतेसाठी एसटीला ४५० कोटी दरवर्षी द्यावे लागतात.

रावतेंमुळे एसटी महामंडळाचे खासगीकरण अन्‌ तोटाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादींची सत्ता असताना एसटी महामंडळाला केवळ पाचशे कोटींचा तोटा होता. शिवसेनेचे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात हा तोच साडेपाच हजार कोटींवर गेला. रावतेंनी एसटी महामंडळात खासगीकरणाचे फॅड आणल्‍याने मोठा तोटा सहन करावा लागत असल्‍याचा आरोप ‘इंटक’ संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी आज येथे केला. 

छाजेड म्हणाले, की एसटी गाड्यांची स्वच्छता जेव्हा कर्मचारी करीत होते; तेव्हा केवळ ३६ कोटी दरवर्षी खर्च होता. रावतेंनी खासगीकरण करून स्वच्छतेचा ठेका खासगी कंपनीला दिला. स्वच्छतेसाठी एसटीला ४५० कोटी दरवर्षी द्यावे लागतात. तिकीट देण्यासाठी पंक्चींग मशिन काढून घेतले व इलेक्ट्रॉनिक मशिन आणले. यामुळे देखील तोटा झाला. दहा वर्षात पगार वाढ नाही, कर्मचाऱ्यांसोबतचा करारही नवीन केला नाही. हा तोटा आगामी काळात ९ हजार कोटींवर जाण्याची भिती आहे. महामंडळ डबघाईस येण्यास रावतेंसोबत मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटना जबाबदार असल्‍याचेही ते म्‍हणाले.

इंटकला प्रतिनिधीत्‍व मिळावे
महाराष्ट्र इंटक ही राज्यातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे. असे असूनही कामगार विषयक शासकीय समित्यांमध्ये इंटकला डावलले जात आहे. माथाडी बोर्डाच्या फेररचनेत कामगार प्रतिनिधी म्हणून इंटकला डावलण्यात आले. माथाडी बोर्ड बरखास्त करून फेररचना करून इंटकला प्रतिनिधीत्व मिळावे, अशी आमची मागणी आहे. 

loading image