esakal | एरंडोलमध्ये कोरोनाचा ‘ताप’ होतोय तिव्र

बोलून बातमी शोधा

corona}

प्रशासच्या उपाययोजनांमुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी होऊन शहरासह ग्रामीण भाग कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत होता. मात्र, काही दिवसांपासून अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे.

एरंडोलमध्ये कोरोनाचा ‘ताप’ होतोय तिव्र
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

एरंडोल (जळगाव) : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या एरंडोल तालुक्यात चार दिवसांत रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र नागरिकांकडून याबाबत दक्षता घेतली जात नाही. पोलिस प्रशासन आणि पालिकेने कोरोनाबाबत शासकीय आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 
प्रशासच्या उपाययोजनांमुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी होऊन शहरासह ग्रामीण भाग कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत होता. मात्र, काही दिवसांपासून अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. सोमवारी (ता. २७) तालुक्यात २२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णसंख्या ५५ वर पोचली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही शहरासह ग्रामीण भागात सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांची गर्दी वाढत आहे. नागरिक बिनधास्तपणे मास्क न लावता फिरत असून, नागरिकांची बेपर्वाई काही प्रमाणात कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी पोलिस प्रशासन आणि पालिकेने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्यास काही पोलिस प्रशासन आणि पालिका कर्मचाऱ्यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली असली तरी अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. बसस्थानकावर अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करीत असल्यामुळे प्रशासनाने बसस्थानकावर कर्मचारी नेमून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिस, पालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करीत असून, नागरिकांनीही शासकीय आदेशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे. 

नागरिकांनो, नियम पाळा 
शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर न फिरता घरीच थांबावे, तसेच बाहेर जाताना मास्क लावावा, सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी करू नये, शासकीय आदेशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी, पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांनी केले आहे.