आई ड्युटीवरून घरी आल्‍यावर बसला धक्‍का; सोळा वर्षीय मुलीची आत्‍महत्‍या

आल्‍हाद जोशी
Wednesday, 3 March 2021

आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मृत्यूबाबत कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असा मजकूर चिठ्ठीमध्ये आहे.

एरंडोल (जळगाव) : पंचायत समितीमध्ये कनिष्ट अभियंता असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीने सरकारी निवासस्थानात गळफास घेवून आत्महत्या केली.

एरंडोल पंचायत समितीमध्ये कनिष्ट अभियंता असलेल्या आशालता हरिभाऊ वानखेडे ह्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानी परिवारासह राहतात. आशालता वानखेडे ह्या मंगळवारी (ता. 2) नेहमीप्रमाणे कार्यालयात गेल्या होत्या. सायंकाळी घरी आल्यानंतर त्याना त्यांची सोळा वर्षीय मुलगी रोहिणी हरिभाऊ चंदनकर हिने डोक्याला बांधण्याच्या फेट्याचा कापड घराच्या छताला असलेल्या पंख्याला बांधून गळफास घेतलेल्या दिसून आली. त्यांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. 

चिठ्ठी लिहून ठेवली
नागरिकांनी रोहिणी हिस ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.मयत रोहिणी चंदनकर हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मृत्यूबाबत कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असा मजकूर चिठ्ठीमध्ये आहे. याबाबत विजय रामचंद्र वानखेडे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील, अनिल पाटील करीत आहेत. मयत रोहिणी हिचेवर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहिणी हिचे पश्‍चात आई, वडील, लहान भाऊ व बहिण असा परिवार आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news erandol sixteen year girl suicide home