ऊस उत्पादक ‘पेमेंट’पासून वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer sugar cane

ऊस उत्पादक ‘पेमेंट’पासून वंचित

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगावसह भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी (Farmer) आपला सुमारे ५० हजार टन ऊस (Sugar Cane) रावळगाव शुगर फॅक्टरीला दिलेला आहे. ऊस देऊन चार महिने होऊनही अद्याप शेतकऱ्यांना उसाचे ‘पेमेंट’ दिले गेलेले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘पेमेंट’ न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुणे येथील साखर आयुक्तालयात तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत, साखर आयुक्तांनी रावळगाव शुगर फॅक्टरीला (Sugar factory) नोटीस बजावली आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. (farmer sugar cane sell factory but no return payment)

चाळीसगाव व भडगाव या दोन्ही तालुक्यात उसाचेही उत्पादन घेतले जाते. मात्र, या दोन्ही तालुक्यांच्या हक्काचा बेलगंगा साखर कारखाना खासगी कंपनीने चालवायला घेऊनही तो त्यांना सुरू करता आलेला नाही. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला सुमारे पन्नास हजार टन ऊस रावळगाव शुगर फॅक्टरीला दिला होता. या शेतकऱ्यांना उसाचे ‘पेमेंट’ देण्याची ग्वाही साखर कारखान्याने सुरवातीला दिली. मात्र, चार महिने होऊनही अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांतर्फे बाळासाहेब देवकर (रा. पळासरे, ता. चाळीसगाव) यांनी सुरवातीला चाळीसगावच्या तहसीलदारांकडे तक्रार केली होती. मात्र, तरीही कारखान्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे श्री. देवकर यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांच्या तक्रार केली आहे.

हेही वाचा: अनोखी शक्कल..कर भरणाऱ्यांना मिळणार सोन्याची नथ

उडवाउडवीची उत्तरे

रावळगाव शुगर फॅक्टरीला चार महिन्यांपूर्वी ऊस दिलेला असताना साधारणतः दीड महिन्यांच्या आत पैसे मिळतील, असे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आपला ऊस दिला. मात्र, दीड महिना होऊनही एकाही शेतकऱ्याला ‘पेमेंट’ न मिळाल्याने त्यांनी वेळोवेळी कारखान्याचे एम. डी., शेतकी अधिकाऱ्यांसह संबंधितांशी संपर्क केला. मात्र, प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. असा अनुभव शेतकरी बाळासाहेब देवकर, ऋषिकेश अमृतकार, अमोल वाघ, भावसिंग पाटील यांच्यासह अनेकांना आलेला आहे. त्यामुळे कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पैसे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता पावसाळा तोंडावर असताना खरीप हंगामासाठी पैशांची नितांत गरज असल्याने रावळगाव शुगर फॅक्टरीने आमचे उसाचे ‘पेमेंट’ तातडीने अदा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

रावळगाव शुगर फॅक्टरीला नोटीस

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या उसाचे ‘पेमेंट’ मिळत नसल्याची तक्रार राज्याच्या साखर आयुक्तांकडे केली होती. त्या तक्रारीची आयुक्तांनी दखल घेत, रावळगाव शुगर फॅक्टरीला सुनावणी नोटीस बजावली आहे. त्यामुळे या संदर्भातील सुनावणी २५ मे रोजी साखर आयुक्तांच्या कार्यालयात सकाळी साडेअकराला व्हिडीओ कॉन्फरन्सने होईल. आता या सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांचे ‘पेमेंट’ देण्यासंदर्भात काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top