गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल; चाकुचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप

राजेश सोनवणे
Friday, 18 December 2020

जळगावात उघडकीस आलेल्‍या बीएचआर घोटाळ्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांचाच समावेश असल्‍याचे सांगितले जात असल्‍याने त्‍यांचे नाव संशयाच्या भोवऱ्यात आहे. मात्र हे अद्याप सिद्ध होण्याचे बाकी आहे. यासोबतच आता तीन वर्षापुर्वीच्या घटनेबाबतची फिर्याद दाखल झाल्‍याने महाजन अडचणीत सापडले आहेत.

जळगाव : भाजपचे नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. चाकुचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप महाजन यांच्यावर करण्यात आला असून, तीन वर्षांपुर्वी घडलेल्‍या घटनेबाबत दिलेल्‍या फिर्यादीवरून त्‍यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये अॅड. विजय पाटील यांनी 9 डिसेंबरला सदरची फिर्यादीवरून गिरीश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यात सुनील झंवर यांनाही आरोपी करण्यात आलं आहे.

या प्रकरणाचा आरोप
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा ताबा मिळवण्यासाठी तानाजी भोईटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याला संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने जानेवारी 2018 मध्ये पुण्यात बोलावून घेतले होते. तिथे मला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. सर्व संचालक मंडळातील सर्व सदस्यांचे राजीनामे घेऊन संस्थेचा कारभार आमदार गिरीश महाजन यांच्या हातात द्यावा, अशी धमकी दिली. त्याचवेळी आमदार गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉल करून एक कोटी रुपयांची ऑफर दिल्‍याचा उल्‍लेख आहे. याबाबत अॅड. विजय भास्‍कर पाटील यांनी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर घटनेत गिरीश महाजन यांच्यासह त्‍यांचे निकटवर्तीय म्‍हटले जाणारे सुनील झंवर यांना देखील आरोपी करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news girish mahajan fir nimbhora police station