esakal | ‘जलमिशन’ अंतर्गत २१ कोटींच्या योजनेस मंजुरी 

बोलून बातमी शोधा

jalmession scheme

अलीकडेच वाघनगरातील जनतेला पाणीपुरवठा केल्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या स्वत:च्या गावातील जनतेची पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येणार असल्याने गिरणामाई पाळधीकरांची तहान भागविणार आहे. 

‘जलमिशन’ अंतर्गत २१ कोटींच्या योजनेस मंजुरी 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाळधी (ता. धरणगाव) : पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक (ता. धरणगाव) या दोन्ही गावांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळत जलजीवन मिशन अंतर्गत गिरणेवरून पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २१ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. 
अलीकडेच वाघनगरातील जनतेला पाणीपुरवठा केल्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या स्वत:च्या गावातील जनतेची पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येणार असल्याने गिरणामाई पाळधीकरांची तहान भागविणार आहे. 
पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक ही दोन्ही मोठी गावे असून, त्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ४० हजार आहे. पालकमंत्री पाटील स्वत: येथील रहिवासी असून, त्यांनी गावासाठी आजपर्यंत विविध विकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी पाळधीकरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे आश्‍वासन दिले होते. आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या आश्‍वासनाची पूर्तता करण्यात आली आहे. 

अंदाजपत्रक व आराखड्यास मान्यता
या अनुषंगाने पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द नळपाणीपुरवठा योजनेचा दरडोई खर्च विहित निकषांपेक्षा जास्त असल्यामुळे या नळपाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक यांनी शासनाकडे तांत्रिक मान्यता देऊन सादर केला होता. जलजीवन मिशनचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या तांत्रिक छाननी समितीची बैठक ७ एप्रिलला झाली. त्यात अंदाजपत्रकात पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द येथील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रुपये चार हजार १२५ इतका दरडोई खर्च असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या २० कोटी ९० लाख ६५ हजार इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

अशी असेल योजना 
या योजनेच्या अंतर्गत गिरणा नदीतून पाण्याची उचल करून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एका टेकडीवर उभारण्यात आलेल्या जलकुंभात टाकण्यात येणार आहे. येथून हे पाणी पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक या दोन्ही गावांमधील ग्रामस्थांना जलवाहिन्यांच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. दोन्ही गावांची भविष्यातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन या योजनीची आखणी करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) शनिवारी निघाला आहे.