सासूवर सुन वरचढ; इंजिनिअरींग झालेली सायली माजी सरपंचवर भारी

आल्‍हाद जोशी
Wednesday, 20 January 2021

सासू- सुनेच्या लढतीमुळे मतदान कोणाला करायचे असा प्रश्न मतदारांसमोर उभा राहिला होता. मतदारांनी अनुभवी सासूऐवजी उच्च शिक्षित असलेल्या सुनेला प्राधान्य

एरंडोल (जळगाव) : केवळ 21 वर्ष एक महिना वय असलेल्या उच्च शिक्षित सुनेने राजकीय क्षेत्राचा पुरेसा अभ्यास नसतांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनुभव असलेल्या व माजी सरपंच असलेल्या चुलत सासूचा पराभव करून सर्वांनाच आच्छर्याचा धक्का दिला. एकविस वर्षीय सुनेने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

खडके खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील यांच्या पॅनलसमोर युवा सेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील यांच्या पॅनलने आव्हान उभे केले होते. शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे पॅनल एकमेकांविरोधात निवडणूक लढवत असल्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली होती. या निवडणुकीत उच्च शिक्षित असलेल्या सुन सायली राजेंद्र पाटील व माजी सरपंच असलेल्या चुलत सासू सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांच्या लढतीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते.

माजी सरपंचला नाकारत सुनेला कौल
सासू- सुनेच्या लढतीमुळे मतदान कोणाला करायचे असा प्रश्न मतदारांसमोर उभा राहिला होता. मतदारांनी अनुभवी सासूऐवजी उच्च शिक्षित असलेल्या सुनेला प्राधान्य देऊन सासू व सुनेच्या लढतीत सायली पाटील यांनी चुलत सासू सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांचा 22 मतांनी पराभव केला. मतदारांनी देखील अनुभवी सासूऐवजी उच्च शिक्षित असलेल्या व राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुनेच्या बाजूने कौल दिला. तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापित उमेदवारांना नाकारून नवीन आणि युवा उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते. मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला सेवा करण्याची संधी दिली आहे. मी उच्च शिक्षित असून माझ्या शिक्षणाच्या माध्यमातून गावातील समस्या सोडवून गावाचा विकास करणार असल्याची प्रतिक्रिया सायली पाटील यांनी व्यक्त केले.  

सायली इंजिनिअरींग झालेली
सायली पाटील ह्या महेंद्रसिंह धरमसिंह पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या कन्या असून शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील यांच्या पुतणी आहे. त्यांचे शिक्षण बी.ई. सिव्हीलपर्यंत झाले असून त्यांचा नुकताच उच्च शिक्षित असलेल्या स्वप्निल इंद्रसिंग पाटील यांच्याशी विवाह झाला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram panchayat election over mother in law