एकमेव तृतीयपंथी उमेदवार; ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्यानं अंजली घरोघरी जाऊन देतेय समानतेची शिकवण

राजेश सोनवणे
Sunday, 10 January 2021

तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला. तृतीयपंथी असल्याने तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजलीने हार मानली नाही.

जळगाव : सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत काही लक्षवेधी लढती पाहण्यास मिळतात. पण जळगाव जिल्ह्यातील भादली बु. गावातील एका तृतीयपंथीची उमेदवारी निश्‍चितच चर्चेचा विषय आहे. अंजली (गुरू संजना जान) असे या तृतीयपंथी उमेदवाराचे नाव असून, सध्या ती घरोघरी जावून प्रचारात गुंतली आहे. 

अर्ज ठरला होता बाद तरीही
भादली बुद्रुक (ता. जळगाव) या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. निवडणुकीत तृतीयपंथी अंजलीने वॉर्ड ४ मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला. तृतीयपंथी असल्याने तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजलीने हार मानली नाही. तिने न्यायासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावत न्याय मागितला. न्यायालयाने तिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिल्‍याने तिची उमेदवारी कायम राहिली.

अंजलीच्या उमेदवारीची चर्चा
ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात अंजली या तृतीयपंथीने अर्ज दाखल केल्‍याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात तिच्या उमेदवारीची एकच चर्चा आहे. गावाने अनेक निवडणुका पाहिल्या. परंतु एका तृतीयपंथीयाचा उमेदवारी अर्ज आणि तिने सुरू केलेला प्रचार हा एक निश्‍चितच चर्चेचा विषय ठरत आहे.

घरोघरी भेटीतून प्रचार
तृतीयपंथी असल्याने अंजलीकडे पाहण्याचा ग्रामस्थांचा दृष्टिकोन नकारात्मक मुळीच नाही. ती गरजेच्या वेळी नेहमी मदतीला धावून जात असल्‍याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात असल्‍याने तिच्या घरोघरी जावून प्रचार करण्यास सुरवात झाली आहे. सर्वांना परिचित असल्‍याने आणि प्रचारात मिळणारा प्रतिसाद यावरून बहुमताने निवडून येईल, अशी खात्री अंजलीला आहे. अनेक वर्षे गावाचा विकास झालेला नाही. पाणी, स्वच्छता अशा मूलभूत सुविधाही ग्रामस्थांना मिळत नाहीत. ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी माझा लढा असणार आहे; असे अंजली सांगते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram panchayat election tertiary in home to home meet