तृतीयपंथींने ग्रामपंचायतसाठी अर्ज भरला; मग अधिकाऱ्याच्या निर्णयानंतर झाला असा राडा

राजेश सोनवणे
Friday, 1 January 2021

जळगाव तालुक्यातील असोदा- भादली गटातून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत त्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडली.

जळगाव : जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत जळगाव तहसील कार्यालयात एका तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला. तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद केला. यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथींनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला.

जळगाव तालुक्यातील असोदा- भादली गटातून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत त्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडली. दरम्‍यान उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेत अर्ज बाद केला. तृतीयपंथी असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला.

उमेदवारी चुकीची कशी म्‍हणत..
अर्ज बाद ठरविल्‍यानंतर अंजली पाटील यांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. अर्ज चुकीच्या पद्धतीने हरकत घेत बाद केला असल्‍याचे म्‍हणत आपल्यावर अन्याय असल्याचे त्‍यांनी म्‍हटले. तृतीयपंथी अंजली पाटील यांनी सांगितले की, “मी एक तृतीयपंथी आहे. सर्टिफाईड ट्रान्सजेंडर असल्याबाबत माझ्याकडे प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. या शिवाय आधार कार्ड, मतदान कार्डही आहे. त्यावर देखील माझा तृतीयपंथी म्हणून उल्लेख आहे. असे असताना मला निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने माझा उमेदवारी अर्ज बाद केल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.

आरक्षणाबाबत जाब 
आसोदा-भादली बुद्रुक गावातील एक प्रभाग खुला म्हणून घोषित झाला होता. त्यामुळे अंजली पाटील यांनी या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याचा दावा केला. परंतु या गटाचे आरक्षण बदलवत महिला राखीव असल्यामुळे अंजली पाटील यांच्या अर्जात त्रुटी काढण्यात आली आणि त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. प्रशासनाने ऐनवेळी आरक्षण बदलविल्यामुळे माझा अर्ज बाद झाल्याचा आरोप अंजली पाटील यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram panchayat election tertiary submit form