esakal | सदस्यांना सहलीची सफर; सरपंचपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग 
sakal

बोलून बातमी शोधा

sarpanch selection

दोन टप्प्यांत सरपंच-उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात, पहिल्या टप्प्यात १५ ला २२, दुसऱ्या टप्प्यात १७ ला १९ सरपंच, उपसरपंच निवड करण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींची प्रथम विशेष सभा घेण्यात येणार आहे.

सदस्यांना सहलीची सफर; सरपंचपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग 

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका झालेल्या ७८३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी दोन टप्प्यांत निवडणूक घेण्यात येत आहे. या संदर्भात आदेश नोडल अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी काढले आहेत. दरम्यान, सरपंच आपल्याच मर्जीतील व्हावा यासाठी इच्छुक सरपंच व त्याच्या समर्थकांनी अनेक सदस्यांना सहलीवर नेले आहे. सरपंचपद निवडीच्या दिवशी त्यांना थेट सभेत आणण्यात येणार आहे. 
सरपंचपदाची निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी असल्याने काही तालुक्यांत दोन, तर काही तालुक्यांत तीन टप्प्यांत निवडणूक घेतली जाणार आहे. जळगाव तालुक्यात दोन टप्प्यांत सरपंच-उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात, पहिल्या टप्प्यात १५ ला २२, दुसऱ्या टप्प्यात १७ ला १९ सरपंच, उपसरपंच निवड करण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींची प्रथम विशेष सभा घेण्यात येणार आहे. या सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे. 

असा असेल निवडीचा टप्पा
पहिल्या टप्प्यात शिरसोली प्र.बो., म्हसावद, आसोदा, आवार, कानळदा, कुसुंबा खुर्द, भादली बुद्रुक, फुफनगरी, धानवड, भोकर, बोरनार, नांद्रा बुद्रुक, सावखेडा, मोहाडी, रायपूर, जळगाव खुर्द, फुफणी, वडली, वावडदा, शेळगाव, कानसवाडे, मन्यारखेडा, रिधूर, गाढोदा या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक सोमवारी (ता. १५ फेब्रुवारी) होणार आहे. 
दुसऱ्या टप्प्यात शिरसोली प्र.न., ममुराबाद, तुरखेडा, वडनगरी, उमाळे देव्हारी, आव्हाणे, कंडारी, कठोरा, लमांजन-वाकडी-कुऱ्हाडदे, पिलखेडा, दापोरा, धानोरा बुद्रुक-नागझिरी, चिंचोली, जवखेडे, रामदेववाडी, कडगाव, तरसोद, डिकसाई, नांद्रा खुर्द, खापरखेडा अशा १९ ग्रामपंचायतींतील सरपंच, उपसरपंच निवड बुधवारी (ता. १७) घेण्यात येणार आहे. 

दोन टप्प्यांत सरपंच, उपसरपंच निवड 
तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात १५ ला २२ ग्रामपंचायतींची, तर दुसऱ्या टप्प्यात १७ फेब्रुवारीला १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदासांठी विशेष सर्वसाधारण सभा अध्यासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात येणार आहे. यासाठी ग्रामसेवक, कृषी विस्तार अधिकारी, पुरवठा निरीक्षक, स्थापत्य अभियंता, मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले. 
 
सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकांची तयारी जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांमार्फत करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी असल्याने सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक दोन किंवा तीन टप्प्यांत घेण्यात येत आहे. तसे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. 
- रवींद्र भारदे, महसूल उपजिल्हाधिकारी 

संपादन ः राजेश सोनवणे