विजयी उमेदवारांना लागले सरपंच पदाचे डोहाळे

अमोल महाजन
Thursday, 21 January 2021

निवडणुकीनंतर पुन्हा नवीन आरक्षण काढण्यात येणार असल्याने सरपंच पदाचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणाची उत्सुकता नवनिर्वाचित सदस्यांसह संपूर्ण गावकऱ्यांना लागली आहे.

धानोरा (जळगाव) : नुकताच ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाल्याने गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आता लवकरच सरपंच आरक्षण जाहीर होणार असून त्यामुळे विजयी उमेदवारांची धाकधूक वाढली असून सरपंच पदाचे डोहाळे लागले आहेत. 

निवडणुकीनंतर पुन्हा नवीन आरक्षण काढण्यात येणार असल्याने सरपंच पदाचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणाची उत्सुकता नवनिर्वाचित सदस्यांसह संपूर्ण गावकऱ्यांना लागली आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्वच पक्षांकडून पुढील स्थानिक निवडणुकीतील हालचालींची दिशा ठरत असते. यामुळे सर्वांचे लक्ष या निवडनूकीकडे लागुन आहे.

सरपंच पदासाठी फिल्डिंग
सरपंच पदाचे आरक्षण सोडत बाकी असल्याने सरपंच कोण होणार? याची शाश्वती नसल्याने विजयी उमेदवारांची धाकधुक कायम आहे. सरपंचपदाचे आरक्षण कोणत्या संवर्गासाठी सुटेल? या प्रश्नामध्ये निवडून आलेल्या सदस्यांची व मतदारांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून त्यासाठी आतापासूनच फिल्डींग लावण्यास सरुवात झाली आहे.

सदस्यांची फोडाफोडी होण्याची शक्यता
सरपंच पदाचे आरक्षण अजून गुलदस्त्यात असल्याने सरपंच कोण होणार या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी सुटेल? या विचाराने सरपंच पदाचे स्वप्न पाहणाच्या विजयी उमेदवारांसह गाव पुढाऱ्यांची चिंता वाढली आहे. गावावर वर्चस्वासाठीची पहिली लढाई पूर्ण झाली असली; तरी खरी लढाई मात्र सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनंतर रंगणार आहे. आरक्षण सोडतीनंतर सदस्यांची फोडाफोडी होण्याची दाट शक्यता असते. ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्यांना गाव पुढारी सदस्य फोडाफोडीही करू शकतात.

सरपंच पदाची उत्सुकता वाढली
सोमवारी (ता.18) ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता गावप्रमुखाच्या निवडीचे वेध लागले आहेत. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने पेच निर्माण झाला आहे. यापूर्वी सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीआधीच जाहीर होत होते. यावर्षी मात्र हे आरक्षण सदस्य निवडीच्या निकालानंतर जाहीर होत आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. सरपंच होण्यासाठी एक- दोन सदस्यांची गरज पडत असल्यास दुसऱ्या गटातील सदस्यांना आमिष दाखविले जाऊ शकते. विरोधी गटाची कोंडी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेच सदस्यांचे बहुमत सिध्द करून सरपंच आपलाच व्हावा यासाठी चुरस वाढली आहे.

उपसरपंच पदासाठी ऑफर कोणाला?
आरक्षण सोडतीनंतर एखाद्या गटाकडे संबंधित प्रवर्गातील उमेदवार निवडून आलेला नसल्यास विरोधी गटातील अशा उमेदवारांना दुसऱ्या गटाकडून सरपंच तसेच उपसरपंचपदाच्या ऑफर दिल्या जाऊ शकतात. या सगळ्या शक्यता सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनंतर पाहायला मिळणार आहेत.

बदलाचा नेमका फायदा कुणाला
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यातील 2020 ते 2025 या काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील सरपंचपदाचे आरक्षण सोडत उत्सुकता लागली आहे. युती सरकारच्या कालावधीत सरपंच हा थेट जनतेतून निवडून येण्यात बदल करण्यात आला होता. मात्र युतीचे सरकार जावून आघाडीचे सरकार आल्यानंतर यात बदल करुन निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच निवडण्याच्या पद्धतीत बदल करण्यांत आला आहे. दरम्यान, महाआघाडीचे सरकार आल्यानंतर बदल करित निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच आरक्षण बदल करण्यांत आला आहे. त्याचे ग्रामीण जनतेने स्वागत केले असून यामध्ये अनेक इच्छुकांना संधी मिळेल असा विश्वास देखील नागरिकांनी व्यक्त केला आहे. या बदलाचा नेमका कुणाला फायदा होणार हे निवडीनंतर स्पष्ट होणार आहे. यामुळे या निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होत आहे. या आरक्षणाची उत्सुकता सदस्यांनाही तेवढीच लागून राहिली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram pnachayat election result and winners candidate waiting sarpanch reservation