हनुमानाची मुर्ती चक्‍क लोण्याची..उन्हाळ्यातही नाही वितळत मुर्तीवरील लोणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

avchit hanuman

हनुमानाची मुर्ती चक्‍क लोण्याची..उन्हाळ्यातही नाही वितळत मुर्तीवरील लोणी

जळगाव : रिधूर (ता. जळगाव) येथील अवचित हनुमानाचे पुरातन मंदिर आहे. प्रत्‍येक ठिकाणच्या हनुमानाच्या मुर्तीचे एक वैशिष्‍ट आहे. असेच वैशिष्‍ट रिधूर जवळील अवचित हनुमान मंदिरातील मुर्तीचे आहे. आतापर्यंत हनुमानाची मूर्ती दगड किंवा पीओपीपासून साकारलेली पाहिली असेल. पण भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानाची मुर्ती येथेच पाहण्यास मिळेल. विशेष म्‍हणजे उन्हाळ्यात देखील मूर्तीवरील लोणी वितळत नाही.

तापी नदीच्या काठावर असलेले अवचित हनुमान मंदिर वैशिष्‍ट्‍यामुळे ओळखले जाते. उंच गाभारा असलेल्या मंदिरासह भव्य सभामंडप आहे. १९८६ मध्ये कोळगाव (जि. नगर) येथून आलेले स्वामी माधवदास यांचे अवचित हनुमान मंदिराच्या कायापालटात मोठे योगदान राहिले आहे. स्वामी माधवदास यांच्या प्रयत्नांनी ते पुन्हा नावारूपास आले. या तीर्थक्षेत्राची देखभाल स्वामींच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी कौशल्यादास या पाहतात.

स्‍वयंभू मुर्ती

अवचित हनुमान मंदिरालगत कधीकाळी खूप मोठे वडाचे झाड होते. त्याखाली आजूबाजूच्या परिसरातील गुराखी त्यांची जनावरे चारण्यासाठी येत आणि येथेच झाडाखाली थोडी विश्रांती घ्यायचे. अशात एका गुराख्याला स्वप्न पडले, की वडाच्या झाडाखाली एक हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. जमीन खोदून मूर्ती वर काढल्यावर तिची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर गावाचे कल्याण होईल, असा दृष्टांत त्याला मिळाला. जवळपास सर्वच गुराख्यांना स्वप्नात तसा दृष्टांत मिळाल्यावर गावात चर्चा सुरू झाली. त्यादृष्टीने गावकऱ्यांनी वडाच्या झाडाखाली खोदकाम केले. मात्र, गावातील मोठ्या जमीनदाराने त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला. मात्र, काही दिवसांनी जमिनदारालाही स्वप्नात हनुमानाचा दृष्टांत मिळाला. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांनी जमिनीतून हनुमानाची मूर्ती बाहेर काढून तिची त्याच ठिकाणी बांधलेल्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. अचानक प्रगटलेल्या हनुमानाला 'अवचित हनुमान' संबोधले जाऊ लागले.

लोण्याचा मारोती म्‍हणून ओळख

गावातील एका व्यक्तीकडे त्यांचे नातेवाईक मुक्कामाला थांबले. त्‍यांनी त्‍यांच्या दूध न देणारी म्हैस पूर्ववत दूध देऊ लागल्यावर तुला लोण्याचा नवस दाखवेल, असे बोलून त्यांनी अवचित हनुमानाला साकडे घातले. यानंतर हनुमानाचा चमत्‍कार म्‍हणावा की काय म्‍हणून त्यांच्या म्हशीने दुसऱ्याच दिवशी दूध दिले. यानंतर सदर व्यक्तीने लोण्याचा गोळा घेऊन हनुमानाच्या मंदिरावर येण्यासाठी निघाले. मात्र येताना त्यांना अंधार झाल्‍याने सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने लोण्याचे भांडे छताला टांगून त्यादिवशी नातेवाईकांकडेच मुक्काम केला. त्याच रात्री ज्यांच्याकडे ते मुक्कामी थांबले होते त्यांच्या घराला अचानक आग लागली. आगीत सगळे काही जळून खाक झाले. पण लोण्याचे छताला टांगलेले मडके जशाचे तसे राहिले. नंतर त्यातील लोणी अवचित हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीस लोणी चढविण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे.

लोणी वितळत नाही

लोण्यापासून साकारलेल्‍या मारोतीच्या मुर्तीवर दरवर्षी लोणी लावले जाते. मुर्ती लोण्याची असली तर त्‍यावर कोणत्‍याही प्रकारचा परिणाम जाणवून येत नाही. विशेष म्‍हणजे उन्हाळ्यात जळगाव जिल्‍ह्‍यातील तापमान हे ४५ अंश सेल्‍सिअसच्या जवळ कायम असते. या तिव्र उन्हाच्या झळांमध्ये देखील मुर्तीवरील लोणी वितळत नाही.

Web Title: Marathi Jalgaon News Hanuman Jayanti Avchit Hanuman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top