महिला खाली पडताच अनेकांच्या आरोड्या पण..लग्‍न आटोपून येताना काळाचा घाला

राजेश सोनवणे
Thursday, 24 December 2020

काही अंतरावर घर असताना अजिंठा चौफुली ते इच्छादेवी चौक दरम्‍यान दोघेजण घरी जात असतांना महामार्गावरील स्पीड ब्रेकरजवळ दुचाकीवरील तोल गेला. यामुळे मिना तळेले या रस्‍त्‍यावर पडल्या.

जळगाव : भुसावळ येथून लग्नाहून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरच्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील प्रभात कॉलनीत राहणारे किशोर हिरामण तळेले आणि त्यांची पत्नी मिना किशोर तळेले हे भुसावळ येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते. दुपारचे लग्न आटोपून पती- पत्‍नी दुचाकीने (क्र. एमएच १९ डीसी ६०२५) घरी येत होते. काही अंतरावर घर असताना अजिंठा चौफुली ते इच्छादेवी चौक दरम्‍यान दोघेजण घरी जात असतांना महामार्गावरील स्पीड ब्रेकरजवळ दुचाकीवरील तोल गेला. यामुळे मिना तळेले या रस्‍त्‍यावर पडल्या. याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने त्यांना चिरडले. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर पती किशोर तळेले हे गंभीर जखमी झाले आहे. मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. 

काळजाचा ठोका चुकला
सदर अपघात घडला त्‍यावेळी मिना तळेले यांची जोरदार किंचाळी रस्‍त्‍यावरील इतरांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. मिना तळेले यांना चिरडून आयशर भरधाव वेगाने निघून गेला. यानंतर अपघातातील मृतदेहाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. घटना घडल्‍यानंतर एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस कर्मचारी अल्ताफ पठाण, नितीन पाटील, इम्रान बेग, गणेश शिरसाठ, तुषार चौधरी आदीं रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती तर वाहतूकीचा खोळंबा झाला होता. यावेळी पोलीसांच्या मदत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news highway accident husband wife death