जळगावातील चौपदरीकरण मार्चपर्यंत पूर्ण होणे ‘दिवास्वप्न’च 

देवीदास वाणी
Sunday, 10 January 2021

गेल्या वर्षभरापासून काम सुरू झाले. वर्षभराच्या आत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना कोरोना संसर्गामुळे काम लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते. मात्र आता गेल्या सहा महिन्यांपासून अनलॉकनंतर सर्व कामगार कामावर आलेले आहे.

जळगाव : शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. येत्या मार्चअखेर चौपदरीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र आताच्या कामाची स्थिती पाहाता काम मार्चअखेरही पूर्ण होणार नाही. किमान सहा महिने तरी काम पूर्ण होण्यास लागतील. नागरिकांना महामार्गावरून जाताना अजून सहा महिने अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 
शहरातील चौपदरीकरणाचे काम ‘झांडू’ कंपनीला देण्यात आले आहे. कालिकामाता मंदिरापासून ते खोटेनगरपर्यंतचा रस्ता या कामात चौपदरी होणार असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. गेल्या वर्षभरापासून काम सुरू झाले. वर्षभराच्या आत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना कोरोना संसर्गामुळे काम लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते. मात्र आता गेल्या सहा महिन्यांपासून अनलॉकनंतर सर्व कामगार कामावर आलेले आहे. तरी शहरातील चौपदरीकरणाच्या कामात हवीतशी प्रगती झालेली नाही. अपूर्ण कामामुळे, अडथळा असल्याचे फलक न लावल्यामुळे महामार्गावरील अपघाताच्या संख्येत वाढच होत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी तरी.. 
शहरातील चौपदरीकरणाच्या कामात काय काय अडचणी येतात, याची पाहणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी महिन्याभरापूर्वी केली होती. त्यात महापालिकेच्या जलवाहिन्या, विजेचे खांब, डीपी, अतिक्रमणे यांचा अडथळा आल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना बोलावून अडचणीचे ठरणारे विजेचे खांब, डीपी, जलवाहिन्या हटविण्याबाबत सांगितले होते. मात्र अद्यापही अडथळे हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला कामे न करण्यास रान मोकळे झाले आहे. 

ही आहेत अपूर्ण कामे..
महामार्ग चौपदरीकरणात प्रभात कॉलनी, अग्रवाल चौक, गुजराल पेट्रोलपंप, दादावाडी येथे व्हेइकल अंडर पास (व्हीयूपी) तयार होणार आहे. यात प्रभात कॉलनीसमोरील व्हीयूपी काम झाले असले तरी त्याखालील लोखंडी सपोर्ट काढला नसल्याने पुलाखालून वाहतूक सुरू झालेली नाही. पुलाच्या दोन्ही बाजूने भरावाचे काम बाकी आहे. अग्रवाल चौकात व्हीयूपीचे काम सुरू झालेले नाही. गुजराल पेट्रोलपंपासमोर अद्याप काम सुरू आहे. दादावाडीसमोरील व्हीयूपीखालून वाहनांना ये-जा करण्यास रस्ता मोकळा आहे. मात्र व्हीयूपीच्या दोन्ही बाजूचे कामे बाकी आहेत. सोबत अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडचे कामेही बाकी आहे. ही सर्व कामे मार्चअखेरपर्यंत होणार नाही. किमान सहा महिने तरी कामे पूर्णत्वाकडे नेण्यास लागणार आहे. जिल्हाधिकारी, महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news highway fourway work slow not complate march