
आठच्या सुमारास नायर कंपनीतून घरी परतले असता, त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व घरात सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरीची खात्री झाल्यावर नायर यांनी जिल्हापेठ पोलिसांना प्रकार कळविला.
जळगाव : मानराज पार्क द्रौपदीनगरात खासगी कंपनीतील नोकरदार दांपत्याचे घर फोडून एक लाखाची रोकड व तीन लाखांचे दागिने असा चार लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलिसांत सोमवारी (ता. १) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शेजारच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले. अवघ्या आठ मिनिटांत कडीकोयंडा तोडून चार लाखांच्या ऐवजासह चोर पसार झाले.
मानराज पार्क परिसरात द्रौपदीनगरात (प्लॉट क्रमांक ११) येथे राजी नायर (वय ४८) वास्तव्यास आहेत. सोमवारी ते घराला कुलूप लावून नेहमीप्रमाणे पती-पत्नी एमआयडीसीत खासगी कंपनीत कामावर गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास चोरट्यांनी लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
दहा तोळे सोने खरेदी
कपाटातून एक लाखाची रोकड, हिरेजडित एक लाख रुपये किमतीचे कानातले, तसेच दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन (दोन नग), मंगळसूत्र व कानातले एकूण १० तोळे दागिने असा एकूण चार लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी नेला. आठच्या सुमारास नायर कंपनीतून घरी परतले असता, त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व घरात सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरीची खात्री झाल्यावर नायर यांनी जिल्हापेठ पोलिसांना प्रकार कळविला. माहिती मिळाल्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक मगन मराठे, गुन्हे शोध पथकातील नाना तायडे यांनी घटनास्थळ गाठले, तसेच पाहणी करून माहिती जाणून घेतली. या प्रकरणी राजी नायर यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल आहे. सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे तपास करीत आहेत.
आठ मिनिटांत चोरट्यांची करामत
चोरट्यांनी सुरवातीला बाहेर लोखंडी गेटची दोन वेळा कडी वाजविली. यानंतर आजूबाजूला टेहळणी करून चांगल्या पोशाखात असलेला चोरटा आतमध्ये आला. काही सेकंदांतच त्याने दरवाजाचे कुलूप हातानेच तोडले. यानंतर घरात प्रवेश करून कपाटातील दागिने व रोकड घेऊन तो अवघ्या आठ मिनिटांत बाहेर पडून पसार झाला. हा सर्व प्रकार नायर यांच्या शेजारच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जिल्हापेठ पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे