esakal | रात्रीचा थरार..जिवापाड जपलेले पशुधन डोळ्यादेखत भस्मसात; शॉर्टसर्किटने गोठ्याला आग, तेरा गुरे जखमी

बोलून बातमी शोधा

injuring cattle}

आगीच्या जबड्यातून गुरांना काढण्यासाठी गावकरी सरसावले होते. मुक्या जीवांच्या वेदना मन सुन्न करणाऱ्या आहेत. आगीचे लोट सुरू असताना आतून गुरांच्या हंबरण्याचा आवाज

रात्रीचा थरार..जिवापाड जपलेले पशुधन डोळ्यादेखत भस्मसात; शॉर्टसर्किटने गोठ्याला आग, तेरा गुरे जखमी
sakal_logo
By
शंकर भामेरे

पहूर (जळगाव) : जामनेर तालुक्यातील लोंढरी येथे गुरुवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास गुरांच्या गोठ्यास विजेच्या शॉटसर्किटमुळे  लागलेल्या आगीत मोठी पशूहानी झाली आहे. शेतकरी बांधवांनी जिवापाड जपलेले पशुधन डोळ्यादेखत जळल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. 
जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील शेतकरी अरूण पडोळ, शिवराम पडोळ, दिपक पडोळ, सुधाकर भागवत यांच्या गोठ्यामध्ये नेहमीप्रमाणे गाई, म्हशी बांधलेले होते. गुरुवारी (ता. ४) मध्यरात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला कमी वाटणाऱ्या आगीने मात्र वेळातच रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये एका गायीसह म्हशीची २ पारडू जळून भस्मसात झाले. तसेच दोन म्हशी डोळ्याने अंध झाल्या असून सुमारे १३ गुरे आगीमुळे होरपळली आहेत. यागीत मानवी जीवीताची हानी झालेली नसली तरी शेतकऱ्यांचे ५ ते ८ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

फुटला अश्रृंचा बांध
जीवापाड जपलेल्या गाई- गुरांना डोळ्या देखत जळतांना पाहून शेतकऱ्यांचे हृदय हेलावून गेले. आगीच्या जबड्यातून गुरांना काढण्यासाठी गावकरी सरसावले होते. मुक्या जीवांच्या वेदना मन सुन्न करणाऱ्या आहेत. आगीचे लोट सुरू असताना आतून गुरांच्या हंबरण्याचा आवाज आणि त्‍यांची बाहेर निघण्यासाठी सुरू असलेली धडपड मन सुन्न करत होती. सकाळी तलाठी स्वाती भंगारे यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच राजमल भागवत पोलीस पाटील, संगीताबाई चिकटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या संकटातून सावरण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे .

धान्य, चारा आणि कृषी अवजारे नष्‍ट
खळ्यात साठवलेले अन्नधान्य, नवीन ५ क्विंटल गव्हाची पोती, २ क्विंटल तूर, चारा, पशुखाद्य, कुट्टी, लाकडी कृषी अवजारे, टोमॅटोचे कॅरेट, ढेपची पोते, ठिबक नळ्यांचे बंडल यासह होते. हे सर्वच आगीत भस्‍म झाले. आगीचे लोळ इतके प्रचंड होते कि, सर्वदूर धुराचे लोट उठत होते. घटनेची वार्ता गावात वाऱ्यायासारखी पसरली. गावकरी मोठ्या संख्येने आगीच्या दिशेने धावले. मध्यरात्री तरूणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सर्व जण आपापल्या परीने हंडा - बादलीच्या सहाय्याने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. 

भय इथले संपत नाही
आता आग शमली असली तरी जखमी झालेली जनावरे मरण यातनांनी विव्हळत आहेत. गोठ्यात फक्त शिल्लक राहिली आहे राख अन् कोळसा. गोठ्या कडे पाहिल्यावर वाटते भय इथले संपत नाही; अशीच स्‍थिती होत आहे.  

जखमी गुरांवर उपचार
पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ, बीट हवलदार शशिकांत पाटील आदी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पहाटेपर्यंत धुराचे लोट सुरू होते. पोलीस निरीक्षक राहुल खताळ आपल्या सहकाऱ्यांसोबत तीन तास ठाण मांडून होते. जामनेर नगरपरिषदेच्या  अग्नीशामन दलासही पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या आल्या परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अखेर अग्नीशमक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड, जामनेरचे कृषी वैद्यकिय अधिकारी, तसेच पहुरचे तायडे यांनीही गुरांवर उपचार केले.

संपादन ः राजेश सोनवणे