esakal | खानदेशातील ऊस गाळप नऊ लाख टनांवर; श्रीलंकेत साखर निर्यात
sakal

बोलून बातमी शोधा

muktai sugar mill

जळगाव जिल्ह्यात एकच कारखाना सुरू आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे एक लहान कारखाना रोज ६०० ते ८०० टन ऊस गाळप करीत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चार कारखाने सुरू आहेत. त्यात तळोदा येथील एका खासगी कारखान्याचा समावेश

खानदेशातील ऊस गाळप नऊ लाख टनांवर; श्रीलंकेत साखर निर्यात

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : खानदेशात ऊस गाळपाला या महिन्यातच्या दुसऱ्या पंधरवड्यात बऱ्यापैकी वेग आला असून, एकूण गाळप नऊ लाख टनांवर पोचले आहे. गाळपात पुरूषोत्तमनगर (ता.शहादा, जि.नंदुरबार) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याची आघाडी कायम आहे. 
सातपुडा कारखान्याने २८ जानेवारीपर्यंत दोन लाख ८० हजार टन ऊस गाळप केले आहे. यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील मुक्ताई कारखान्याचे गाळप आहे. डोकारे (ता.नवापूर, जि.नंदुरबार) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे गाळपही सुमारे पावणेदोन लाख टन झाले आहे. 

समशेरपूर येथील कारखाना नव्‍याने सुरू
नंदुरबार जिल्ह्यात अलीकडेच समशेरपूर (ता.नंदुरबार) येथे आयान खासगी कारखाना सुरू झाला आहे. या कारखान्याने यंदा गाळप क्षमता प्रतिदिन आठ हजार टन एवढी वाढविली आहे. क्षमता वाढविण्याच्या कामानिमित्त हा कारखाना डिसेंबरपर्यंत बंद होता. हा कारखानादेखील सुरू झाला. या कारखान्यात रोज चार हजार टनांवर ऊस गाळप सुरू आहे, अशी माहिती मिळाली. 

असे आहे खानदेशातील कारखाने
जळगाव जिल्ह्यात एकच कारखाना सुरू आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे एक लहान कारखाना रोज ६०० ते ८०० टन ऊस गाळप करीत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चार कारखाने सुरू आहेत. त्यात तळोदा येथील एका खासगी कारखान्याचा समावेश असून, तेथे रोज दोन हजार टनांवर ऊस गाळप केले जात आहे. खानदेशात गाळप वेगात सुरू आहे. यातच जळगाव व धुळे जिल्ह्यात नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील खासगी कारखाने उसाची खरेदी, वाहतूक करीत आहेत. 

ऊस तोडणीत खंड नाही
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, चोपडा आदी भागात बाहेरील जिल्ह्यातील कारखाने ऊस खरेदी करीत आहेत. ऊसतोडणी यंदा कुठेही रखडलेली नसल्याची स्थिती आहे. मध्यंतरी गाळपाला पावसामुळे नंदुरबार, धुळे जिल्ह्यात फटका बसला होता. १८ डिसेंबर ते २१ डिसेंबर यादरम्यान खानदेशात धुळे जिल्ह्यात साक्री, नंदुरबारमधील तळोदा, नवापूर भागात जोरदार पाऊस झाला होता. यामुळे उसतोडणी बंद झाली होती. या महिन्यात मात्र ऊस तोडणी सर्वत्र वेगात सुरू आहे. 

‘सातपुडा’ची साखर परदेशात
पुरुषोत्तमनगर : श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याची ७० हजार क्विंटल साखर २५ किलोंच्या बॅगमध्ये सोमालिया व श्रीलंकेत रवाना झाली. उपविभागीय दंडाधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांचा हस्ते पूजा करून पहिला लोड रवाना झाला. यावेळी शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे रवींद्र रावल, सूतगिरणीचे संचालक विजय पाटील, सभासद भूपेंद्र रावल, कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील, तसेच आणंद (गुजरात) येथील सत्येंद्र पॅकिंगचे संचालक भरतभाई पटेल, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. साखरेची मागणी परदेशात वाढू लागल्याने निर्यात गुणवत्ता (एक्स्पोर्ट क्वालिटी) उत्पादन करून शेजारील श्रीलंका आणि सोमालिया या देशांत मागणी वाढल्याने उत्पादन सुरू झाले आहे. 

loading image