चॅनल्‍स्‌वरील हाणामारीच्या व्हिडीओचे सत्‍य; ‘ती’ तुफान हाणामारी लांबे वडगावची नाहीच

viral video
viral video

मेहुणबारे (जळगाव) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर लांबे वडगाव (ता. चाळीसगाव) येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि विविध वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमध्ये दाखवला जात आहे. प्रत्यक्षात हा व्हिडिओ लांबे वडगावचा नसून दुसऱ्या कुठल्या तरी अन्य गावाचा आहे, असा खुलासा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्याला पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. 
लांबे वडगाव (ता. चाळीसगाव) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटामध्ये धुमश्चक्री उडाली. यात तलवारी, कोयते, लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला. या हाणामारीत दोन्ही गटातील बरेच जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. या घटनेनंतर आज या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून अनेक जण चक्रावले. विविध वृत्त वाहिन्यांनीही हा व्हिडिओ चाळीसगाव तालुक्यातील लांबे वडगावचा असल्याचे सांगून दाखवला. यामुळे मेहुणबारे पोलिस देखील चक्रावले आहेत. 

व्हिडिओ आमच्या गावचा नाहीच 
लांबे वडगावला झालेली हाणामारीची घटना गावातील ॲड. हर्षल पाटील यांच्या घरासमोर घडली होती. या व्हायरल व्हिडिओची पडताळणी करून ॲड. हर्षल पाटील यांना मेहुणबारे पोलिसांनी विचारले असता, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ लांबे वडगावचा नाही, असे स्वतः ॲड. हर्षल पाटील यांनी सांगितले. या व्हिडीओत जी हातगाडी दिसत आहे, ती देखील गावातील नाही. त्याचबरोबर उभा असलेला टेम्पो देखील गावातच नसल्याचे वडगावकरांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मग कोणत्या गावाचा आहे? असा प्रश्‍न मेहुणबारे पोलिसांना पडला आहे. 

राज्यभर व्हिडिओ व्हायरल 
सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरामुळे अनेक जण घटनांची शहानिशा न करताच व्हिडिओ अथवा मेसेज पुढे फॉरवर्ड करतात. आपलीच बातमी ब्रेकिंग व्हावी, या स्पर्धेमुळे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींकडूनही याबाबतीत कुठलीच शहानिशा केली जात नसल्याचे या व्हिडीओवरुन दिसून येत आहे. युजर्सनी घटनेची सत्यता न पडताळताच हा फेक व्हिडिओ व्हायरल केला, जो संबंध राज्यात पसरला. किमान ज्यांच्यावर आजही नागरिकांचा विश्‍वास आहे, अशा माध्यमांच्या वृत्तवाहिन्यांनी तरी शहानिशा करूनच कुठलीही बातमी प्रसारीत करावी, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. 
 
लांबे वडगावच्या नावाने जो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, तो त्या गावाचा नसल्याचे स्वतः या घटनेचे साक्षीदार असलेले ॲड. पाटील यांनी आम्हाला सांगितले. आम्ही देखील काही गोष्टी तपासून पाहिल्या असता, व्हिडिओत दिसणारे घटनास्थळ वडगावशी कुठलेच साम्य दर्शवित नाही. आम्ही या संदर्भात माहिती घेत आहोत. 

- पवन देसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे पोलिस ठाणे, चाळीसगव

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com