esakal | जळगाव जिल्ह्याला मिळणार ३९ टन लिक्विड ऑक्सिजन 

बोलून बातमी शोधा

liquid oxygen

जळगाव जिल्ह्यात दिवसाला साधारण अकराशेपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या समोर येत आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असलेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

जळगाव जिल्ह्याला मिळणार ३९ टन लिक्विड ऑक्सिजन 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा असल्याचे समोर आल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा करत ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली. त्यानुसार रविवारी (ता. ११) जळगाव जिल्ह्यासाठी ३९ टन लिक्विड ऑक्सिजन पोचणार आहे. 

जळगाव जिल्ह्यात दिवसाला साधारण अकराशेपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या समोर येत आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असलेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली असून, आगामी काळात मागणी वाढत राहिल्यास पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता पुरवठादाराने व्यक्त केली होती. याची दखल घेत खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याकडून स्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार जिल्ह्यात एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे लक्षात आले. 
खडसे यांनी तत्काळ आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा करत ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली. रविवारी (ता. ११) सकाळपर्यंत जळगाव जिल्ह्यासाठी ३९ टन लिक्विड ऑक्सिजन पोचणार आहे. 

दोन दिवसांत सुरळीत 
दोन दिवसांत आवश्यक असतील तेवढे रेमडेसिव्हिर इंजेक्शन पाठविण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एकनाथ खडसे यांना दिले. त्यानुसार पुढील दोन दिवसांत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. 
 
रेमडेसिव्हिरसाठी यशस्वी प्रयत्न 
खडसेंच्या प्रयत्नांमुळे जळगाव जिल्ह्याला सध्यातरी आता ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. दुसरीकडे खडसे यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत चर्चा केल्यानंतर चार हजार इंजेक्शन जिल्ह्यात पाठविण्यात आले होते.