बहिणीच्या दिरावर होते प्रेम; कुटूंबियांच्या नकाराने उचलले टोकाचे पाऊल, विष प्राशनानंतर कुटूंबियांना फोन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

बहिणीचा विवाह झाल्‍याने निलम हिचे पिंगळवाडे येथे नेहमी येणे जाणे होते. याच दरम्‍यान निलमच्या बहिणीचा नात्‍याने दिर असलेल्‍या समाधानसोबत प्रेम जुळले.

जळगाव : मोठ्या बहिणीच्या दिरावर दीड वर्षापासून प्रेम जडले. पण त्‍याची आर्थिक परिस्‍थिती बेताची असल्‍याने कुटूंबियांनी प्रेम विवाहाला नकार दिला. यामुळे युवतीसह युवकाने ममुराबाद शिवारात विषारी द्रव प्राशन केले. यात ब्रेनहेड झालेल्‍या युवतीचा उपचारादरम्‍यान रविवारी मृत्‍यू झाला.

ममुराबाद येथील रहिवासी असलेल्‍या निलम (नाव बदललेले) हिच्या बहिणीचा विवाह झाल्‍याने पिंगळवाडे (ता.अमळनेर) येथे राहते. निलम हिचे पिंगळवाडे येथे नेहमी येणे जाणे होते. याच दरम्‍यान निलमच्या बहिणीचा नात्‍याने दिर असलेल्‍या समाधानसोबत प्रेम जुळले. परंतु, दोघांच्या लग्‍नाला विरोध असल्‍याने दोघांनीही जगाचा निरोप घेण्याचे ठरविले.

लहान बहिणीला केला फोन
ममुराबाद येथील बाविस वर्षीय तरूणी आणि पिंगळवाडे (ता. अमळनेर) येथील समाधान सैंदाणे (वय २५) या दोघांनी १९ जानेवारीला विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार केल्‍यानंतर निलमने लहान बहिणीला फोन करून आम्‍ही विषारी द्रव घेतल्‍याचे सांगितले. यानंतर मोहिनीची लहान बहिण पुजाने सदर प्रकार वडिलांना सांगितला. यानंतर निंबा कोळी व अन्य नातेवाईक शेतात गेले असता समाधान आणि निलम हे बेशुद्धावस्‍थेत आढळून आले. त्‍यांच्याजवळ विषारी द्रवाच्या दोन बाटल्‍या पडलेल्‍या आढळून आल्‍या. यानंतर दोघांनाही शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्रियकर वाचला पण..
रूग्‍णालयात येत असताना तंबाखू खाल्‍ल्‍यामुळे समाधानला उलटी झाली. यामुळे प्राशन केलेले विषारी द्रव बाहेर निघाले. निलमची प्रकृती मात्र खालावलेली होती. दरम्‍यान उपचारानंतर समाधानची प्रकृतीत सुधारणा झाल्‍यानंतर त्‍यास शुक्रवारी घरी सोडण्यात आले. मात्र निलमच्या पोटात द्रव गेल्‍याने प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. दरम्‍यान रविवारी (ता.२४) तिचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news love matter girl death in try suicide