त्‍याचे प्रेम पोलिस कॉन्स्‍टेबल तरूणीवर..गावातील लग्‍नात आले एकत्र नंतर झाले भांडण; त्‍यानंतरचा प्रकार भयानक

राजु कवडीवाले
Tuesday, 19 January 2021

पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या युवतीशी गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. गावात लग्न समारंभाच्या निमित्ताने शरद पाटील व प्रेयसी तरुणी एकत्र आले होते.

यावल (जळगाव) : महिला पोलिस कॉन्स्टेबलशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून कुटुंबियांनी प्रियकराच्या 72 वर्षीय वयोवृध्द आजीच्या घरास आग लावून आत्याचेही घर पेटविण्याचा प्रयत्न केला. सदर घटना चुंचाळे (ता. यावल) गावात घडली. प्रियकराच्या आजीच्या फिर्यादीवरुन सात संशयितांविरुध्द येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
चुंचाळे येथील शरद अशोक पाटीलचे गावातीलच मात्र इतर जिल्ह्यात पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या युवतीशी गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. याचे वाईट वाटून प्रेयसी तरुणीच्या कुटुंबियांनी वादातून प्रियकराच्या आजीचे घर जाळून टाकले. सोमवारी गावात लग्न समारंभाच्या निमित्ताने शरद पाटील व प्रेयसी तरुणी एकत्र आले होते. यावेळी लग्नमंडपात प्रियकराचे युवतीसोबत भांडण झाले. यावेळी तिचे वडील आणि नातलगांचे देखील भांडण झाले. तेव्हा लग्नसमारंभात वाद नको म्हणून भांडण मिटवण्यात आले. 

नंतर आले आणि घराला लावली आग
पुन्हा साडेचार- पाच वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी हातात लाठ्याकाठ्या घेऊन संशयितांचा जमाव आला आणि त्यांनी त्या प्रियकराच्या आजीचे घर जाळून टाकले. यात घरातील एलईडी टीव्ही, लाकडी पलंग, फ्रीज, गाद्या, वापरावयाच्या वस्तू जळून खाक होऊन अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. प्रियकराची आजी जनाबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय संशयितांनी प्रियकराची आत्या ललिता हरी पाटील हिच्या घरातही अनाधिकाराने शिरुन फ्रीज, टीव्हीची नासधूस केली आहे. प्रेयसी पोलिस कर्मचारीसह संशयित जुम्मा तडवी, फिरोज तडवी, अफरोज तडवी, मुमताज तडवी, रुकसाना तडवी, आरीफ़ा तडवी, संजू तडवी या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जुम्मा हसन तडवी व अफरोज जुम्मा तडवी या दोन संशयितांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधिर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार हे करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news love matter girl family fire in lover house