रावळगाव कारखान्याकडून शेतकऱ्यांची देणी बँक खात्यात

रावळगाव कारखान्याकडून शेतकऱ्यांची देणी बँक खात्यात
रावळगाव कारखान्याकडून शेतकऱ्यांची देणी बँक खात्यात
Updated on

चाळीसगाव (जळगाव) : सुमारे सहा महिन्यांपासून उसाचे पेमेंट थकविणाऱ्या रावळगाव साखर कारखान्याला आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांचे पैसे देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. (jalgaon-malegaon-ravalgaon-sugar-factory-refund-farmer-bank-account)

तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा बेलगंगा साखर कारखाना सुरू न झाल्याने बऱ्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रावळगावच्या एस. जे. शुगर कारखान्याला ऊस दिला होता. कारखान्याने शेतकऱ्यांना पेमेंटचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही कारखानाने दिला नाही. सुरवातीला काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर कारखाना व्यवस्थापनाला वेळोवेळी विनंती केली. मात्र, दखलच घेतली जात नव्हती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आमदार चव्हाण यांची भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली. नंतर आमदार चव्हाण यांनी थेट रावळगाव कारखान्याचे मालक आमदार जयंत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांची देयके देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, प्रत्यक्ष कृती केली नाही. त्यानंतर पुन्हा शेतकरी एकत्र आले असता, आमदार मंगेश चव्हाण यांनी १५ दिवसांत थकीत पेमेंट न झाल्यास कारखाना व्यवस्थापनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

सील लागल्‍यानंतर देयके देण्यास सुरवात

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मालेगावच्या तहसीलदारांनी रावळगाव कारखान्याच्या साखरेच्या गुदामाला सील लावले. या सर्व पार्श्वभूमीवर कारखान्याने नमते घेत शेतकऱ्यांची देयके देण्यास सुरवात केली असून, सोमवारी (ता. २१) संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, ‘एफआरपी’प्रमाणे दोन हजार ३०० रुपयांहून अधिक रक्कम प्रतिटनाप्रमाणे निघाली असून, त्यावरील शासन नियमाप्रमाणे व्याज अशी सर्व रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, तसेच उर्वरित रक्कमही कारखान्याने तातडीने अदा करावी, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्याचा शेवटचा रुपया निघेपर्यंत आपला लढा सुरू राहील. नेमकी किती रक्कम ते आता देणार आहेत व उर्वरित रकमेबाबत कारखाना प्रशासनाची काय भूमिका आहे, हे शेतकऱ्यांच्या सोबत जाणून घेतल्यानंतर पुढील भूमिका व आंदोलनाची दिशा ठरविली जाईल.

- मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com