‘गिरणा’चे माफियांकडून वस्त्रहरण सुरूच; वाळूचे दोन ट्रॅक्टर 

दीपक कच्छवा
Sunday, 3 January 2021

अनेक दिवसांपासून वाळू गिरणा पट्ट्यात लिलाव झालेला नाही. बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूची गिरणापात्रातून चोरी करूनही वाळू जास्त भावात विकली जात आहे.

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव तालुक्‍यातील मेहुणबारे परिसराला सुजलाम् सुफलाम् करण्यात मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या गिरणा नदीपात्राचे वाळूमाफियांकडून वस्त्रहरण सुरूच आहे. गिरणा परिसरात चोरट्या मार्गाने वाळू चोरणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाया होत असल्या, तरी वाळूउपसा थांबायला तयार नाही. रात्री दीडच्या सुमारास रहिपुरी (ता. चाळीसगाव) नदीपात्रात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर मेहुणबारे पोलिसांनी जप्त केले. 
अनेक दिवसांपासून वाळू गिरणा पट्ट्यात लिलाव झालेला नाही. बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूची गिरणापात्रातून चोरी करूनही वाळू जास्त भावात विकली जात आहे. मेहुणबारे पोलिस ठाण्यात नवीन आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

पात्रात पोलिसांची धडक 
राहिपुरी (ता. चाळीसगाव) गिरणापात्रात वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती  मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देसले यांना मिळाली. त्यांनी व सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने शनिवारी (ता.२) हवालदार मिलिंद शिंदे, संजय कुमावत, हिलाल पाटील, गोरख चकोर, शैलेश माळी यांनी थेट गिरणापात्रात धडक दिली. पोलिसांना पाहताच चालक व मालक फरारी झाले. यामुळे पुन्हा एकदा कारवाया सुरू झाल्याने वाळूमाफियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

दोन ट्रॅक्टर जप्त 
रहिपुरी (ता. चाळीसगाव) येथील गिरणापात्रात पोलिसांनी रात्री दीडच्या सुमारास स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर विशाल भिडे, महिंद्र कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली, तर राहुल कदम (दोन्ही रा. रहिपुरी, ता. चाळीसगाव) हे दोन्ही ट्रॅक्टर वाळूने भरलेले आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात जमा करून दंडात्मक कारवाईसाठी चाळीसगाव तहसीलदारांकडे अहवाल पाठविण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मेहुणबारे परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील, तर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवावे. कुणाचीही गय केली जाणार नाही. पोलिसांना ग्रामस्थांनी सहकार्य करावे. 
- पवन देसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे, ता. चाळीसगाव 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news mehrunbare police action valu mafiya in girna river