esakal | सिंचन योजना तीन वर्षांत पूर्णत्वास नेणार : जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil

कट्टपा ने बाहुबली को क्यो मारा, क्योकी बाहुबली आगे आता तो उसको बाहर जाना पडता’, असे म्हणत मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आणि ‘कट्टपा ने बाहुबली को क्यो मारा’ या आपल्याच प्रश्‍नाचे मुक्ताईनगर येथे उत्तर राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत दिले.

सिंचन योजना तीन वर्षांत पूर्णत्वास नेणार : जयंत पाटील

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुक्ताईनगर (जळगाव) : मुक्ताई उपसा आणि तळवेल योजनेची कामे प्राधान्याने केली जाणार असून कुऱ्हा, वडोदा तसेच बोदवड आणि मुक्ताई उपसाचा आढावा घेण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. तसेच लवकच मेगा रिचार्जला चालना देत मागील पाच वर्षांचा ‘बॅकलॉग’ भरून काढू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 
राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेनिमित्त आयोजित पक्षाच्या मेळाव्यात शुक्रवारी शुक्रवारी (ता. १२) रात्री ते बोलत होते. जलसंपदा मंत्री पाटील यांनी येथील मेळाव्यात चौफेर टीका करत भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. ‘कट्टपा ने बाहुबली को क्यो मारा, क्योकी बाहुबली आगे आता तो उसको बाहर जाना पडता’, असे म्हणत मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आणि ‘कट्टपा ने बाहुबली को क्यो मारा’ या आपल्याच प्रश्‍नाचे मुक्ताईनगर येथे उत्तर राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत दिले. शुक्रवारी (ता. १६) या यात्रेचा १६ वा दिवस होता. तर पुढील पाच वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार आहेत, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

..तर केंद्रात परिवर्तन 
‘राष्ट्रवादी’ हा कार्यकर्त्यांचा बुरुज राखणारा पक्ष आहे. शेतकरी, कष्टकरी यांना भाजप न्याय देत नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जनतेत रोष आहे. कामगार आणि कष्टकरी एक झाले तर केंद्रात ही परिवर्तन अटळ आहे. 

अनेकांचा पक्षप्रवेश 
या सभेत मुक्ताईनगर, बोदवड पंचायत समिती सभापती आणि सदस्य, मुक्ताईनगर नगरपंचायतीतील काही सदस्य, सावदा नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालक आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तीन तास उशिराने रात्री पावणे नऊला ही सभा सुरू झाली. पावणे अकराला सभा संपली. 

यांची होती उपस्थिती 
याप्रसंगी ॲड. रोहिणी खडसे, रुपाली चाकणकर, सक्सेना सलगर, माजी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, विनोद तराळ, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, यू. डी. पाटील, मुरलीधर तायडे, मेहबूब शेख, राजेश वानखेडे, माजी आमदार मनीष जैन यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 

रोहिणीताईंनी मागितले अन् जयंत पाटलांनी दिले 
आपल्या भाषणात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी आगामी काळात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथवर वन बूथ थर्टी युथ व बूथ कार्यकारिणी तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करू, असा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शब्द दिला. त्याचबरोबर मतदारसंघात नाथाभाऊ यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या व अपूर्णा अवस्थेत असणाऱ्या सिंचन योजना यांना निधी मिळावा, अशी मागणी केली. त्यावर आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी सर्व योजनांचा आढावा घेऊन लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ व तीन वर्षांत योजना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू आणि जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेल्या मुक्ताई उपसा सिंचन योजनेस तत्काळ निधी उपलब्ध करून देतो, असे सांगितले 

गद्दारांना धडा शिकवू : खडसे 
माजी मंत्री खडसे यांनी आपल्या भाषणात गद्दारांची फौज आता बाहेर आली आहे. त्यांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे सांगत यांनीच रोहिणी खडसे यांना पाडले. त्या साठी पैसाही पुरविला. मी पक्ष सोडला नाही, तुम्हीच सोडण्यास भाग पाडले. ज्याना बोट धरून पुढे आणले मोठे केले ते आज गद्दार झाले. जे बापाला झाले नाही ते तुम्हाला काय होणार, असे म्हणत खडसे यांनी भाजपतील आपल्या विरोधकांचा समाचार घेतला. 

loading image