esakal | राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर? 

बोलून बातमी शोधा

nagar parishad election}

एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांची १ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती, ती आता १५ ला प्रसिद्ध होणार आहे. तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही ३१ मार्चला प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर? 
sakal_logo
By
सुधाकर पाटील

भडगाव (जळगाव) : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे नगरपरिषदांचे कर्मचारी व्यस्त आहेत. परिणामी, प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींवर क्षेत्र भेटी करून निर्णय घेणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांची १ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती, ती आता १५ ला प्रसिद्ध होणार आहे. तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही ३१ मार्चला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे नगरपरिषदांची अगोदरच लांबलेली निवडणूक अजून पुढे लांबण्याचे चिन्हे आहेत. 
मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने मुदत संपलेल्या भडगाव, वरणगावसह राज्यातील १३ नगरपरिषद, ८२ नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली होती. मतदार याद्यांचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. 
 
१५ मार्चला अंतिम प्रसिद्धी 
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार १५ तारखेला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर २२ तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत होती. तर १ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावयाची होती. मात्र, हरकती संख्या आणि सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे नगरपरिषदांचे कर्मचारी त्या कामात व्यस्त आहेत. पर्यायाने कर्मचाऱ्यांना स्थळ भेटीद्वारे वस्तुनिष्ठ निर्णय घेण्यासाठी वेळ लागत असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडे नगरपरिषदांनी निवडणूक आयोगाला कळविले होते. त्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा कार्यक्रम तब्बल १५ दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. एक मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती, ती आता १५ मार्चला प्रसिद्ध होणार आहे. आठ मार्चला मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम होता. मात्र आता ३१ मार्चला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसे निवडणूक आयोगाचे पत्र निवडणूक होऊ घातलेल्या सर्व नगरपरिषद यांना प्राप्त झाले आहे. 
 
मेच्या पहिल्या आठवड्यात शक्य 
मतदार यादीचा कार्यक्रम निवडणुका पुढे ढकलल्यामुळे राज्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकाही लांबणीवर पडण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. ३१ मार्चला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडे केली जाऊ शकते. मात्र, त्या वेळेस कोणाची परिस्थिती काय आहे? त्यानंतर हा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधारणपणे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे