गाय हंबरत राहिली पण त्‍याने डाव साधलाच

राजेंद्र पाटील
Sunday, 27 December 2020

रात्रीचा अंधार होता. गाय, वासरूसह चार- पाच जनावर शेताच्या बांधावर बांधले होते. रात्रीच्या अंधारात या सर्व जनावरांचा एकच हंबरडा सुरू झाला. पण त्‍यांच्या मदतीला कोणी आले नाही आणि डाव साधत तो परत गेला.

नांद्रा (ता.पाचोरा) : जळगाव जिल्‍ह्‍यातच नव्हे; तर आजूबाजूच्या सर्वच भागांमध्ये नव्हे तर गावांमध्ये बिबट्याचा संचार वाढला आहे. गेल्‍या काही दिवसात अशा अनेक बातम्‍या देखील ऐकण्यास मिळाल्‍या आहेत. असाच रात्रीच्यावेळी नांद्रा परिसरात बिबट्या आला आणि गाय, वासरूवर हल्‍ला चढविला.
नांद्रा गावालगत असलेल्या उत्तम कौतिक पाटील यांच्या गट 9 मध्ये मध्यरात्री शेताच्या बांधावर बांधलेल्या एकूण चार ते पाच जनावरांमधील एक पाच वर्षीय गाय व दिड वर्षीय वासरुवर हिंस्र प्राण्यांच्या हल्यात मृत झाल्‍याच्या अवस्थेत आढळून आले. या भागात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आले आहे. प्राण्यांवर हल्ला करुन त्यांना झाडावर घेऊन गेल्याची हि घटना नवीनच असतांना गावालगत झालेल्या या घटनेमुळे शेतकरी वर्गात प्रचंड घबराहट पसरली आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 

वन्य प्राण्यांचे दर्शन
गेल्या अनेक अनेक दिवसांपासून नांद्रा, आसनखेडा शिवारात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. परिसरात वारंवार निलगाय, हरीन, रानडुक्‍कर यासारखे वन्य प्राणी पाहण्यास मिळाले असून, शेतात किंवा गोठ्यात बांधलेल्‍या जनावरांवर हल्ला चढवून प्राण्यांना आपले भक्क्ष बनवून खात असल्याचे शेतकरी किंवा वनविभागाच्या लक्षात आले आहे. आतातर गावाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शेताच्या बांधावरील पाळीव प्राण्यांच्या हल्यामुळे गावकरी व शेतकरी भयभीत झाले आहेत. घटनास्थळी वन क्षेत्रपाल डि. एस. देसाई, वनपाल सुनिल भिलावे, वनरक्षक श्री. ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news nandra village night leopards attack cow