esakal | आजीचे हात अजूनही थरथरत नाही; विणलेल्या स्वेटरची अनाथ बालकांना भेट
sakal

बोलून बातमी शोधा

old lady woven sweaters

प्रवासातच बस, रेल्वेत हातात सतत भरतकाम, विणकाम करत राहणे हा त्यांचा छंदही त्यांनी जोपासला. दोन- अडीच दशकांत विणकामात आपले मन रमवत १५ हजारांवर स्वेटर विणले आणि ते अनाथालयाला देत तेथील बालकांना मायेची ऊब दिलीय...

आजीचे हात अजूनही थरथरत नाही; विणलेल्या स्वेटरची अनाथ बालकांना भेट

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : राष्ट्रसेविका समितीच्या संस्कारातून व्रतस्थ जीवन जगणाऱ्या मृणालिनी चौघुले या आजींनी दोन- अडीच दशकांत विणकामात आपले मन रमवत १५ हजारांवर स्वेटर विणले आणि ते अनाथालयाला देत तेथील बालकांना मायेची ऊब दिलीय... 
विविध क्षेत्रांत लौकिक मिळवून पुरुषांपेक्षाही स्वत:ला सिद्ध करणाऱ्या महिलांच्या अनेक यशोगाथा त्यांचे यश अधोरेखित करतात. तद्वतच सेवा क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा महिलांनी उमटवलाय. त्‍याचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे मृणालिनी आजी.

सेवेचा वारसा 
मृणालिनी विजय चौघुले (वय ८३) हे त्यापैकी एक नाव. राष्ट्रसेविका समितीचे त्यांच्यावर संस्कार. त्यांच्या सासू कमलाबाई यांनी जळगावात १९३८ ला दसऱ्याला राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. आजही समितीचे सेवाकार्य सुरू आहे. मृणालिनी यांनी सासूबाईंचा वारसा पुढे सुरू ठेवला. समितीच्या प्रचारासाठी धुळे, भडगाव, चाळीसगाव येथे प्रवास करणे अशी अनेक कामे त्यांनी मनापासून केली. 

असा जोपासला छंद 
प्रवासातच बस, रेल्वेत हातात सतत भरतकाम, विणकाम करत राहणे हा त्यांचा छंदही त्यांनी जोपासला. अभिनयाची आवड असल्याने लहानपणापासून नाटकातूनही भूमिका केल्या. पुढे लग्न झाल्यावर जळगावातील राज्य नाट्य स्पर्धेत अनेक भूमिका त्यांनी केल्या. 

विणकामातून समर्पण 
पुढे पती विजय यांना कर्करोगाने ग्रासले, त्या वेळी दवाखान्यात फावल्या वेळेत लहान बाळांसाठी स्वेटर विणण्यास सुरवात केली. घरी आल्यानंतरही पतीसेवेसोबतच लहान मुलांसाठी स्वेटर विणणे सुरू ठेवले. तयार केलेले स्वेटर राष्ट्रसेविका समितीकडे त्या देत. समितीमार्फत हे स्वेटर वेगवेगळ्या अनाथालयात पाठविण्यात येत. 

२५ वर्षांपासून कार्ययज्ञ 
या कामाची माहिती मिळाल्यानंतर समितीमधील इतर महिलांनीसुद्धा आपापल्या परीने मदत केली. कोणी लोकर आणून दिली, कोणी नागपूरला राष्ट्रसेविका समितीच्या कार्यालयात स्वेटर पोचवून देत. एक हजार, दोन हजार असे करत आतापर्यंत हा कार्ययज्ञ तब्बल १५ हजार स्वेटरपर्यंत पोचला आहे. हे स्वेटर समितीच्या माध्यमातून अनाथालयातील बालकांपर्यंत पोचविले आहेत. त्यांच्या या कामात श्रीमती मेलग, लिमये, मदाने, मोघे या महिलांनी मोठे योगदान दिले आहे. नुकताच त्यांनी १५ हजारावे स्वेटर विणून ते राष्ट्रसेविका समिती कार्यालयात पाठविण्यासाठी वर्षा मोघे यांच्याकडे सुपूर्द केले. 

संपादन ः राजेश सोनवणे