
सर्वसामान्यांसारखाच गणेशच्या कुटुंबालाही याचा फटका बसला... शेतीची लाकडी औजारे बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला. कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा, असा प्रश्न समोर असतानाच गणेशने आपल्या कलेला वेगळी वाट निर्माण करून देत छोट्या बैलगाड्या तयार केल्या.
पारोळा (जळगाव) : अंगात कला असली, की व्यक्ती कोणत्याही संकटावर मात करू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पारोळ्याचा तरुण गणेश लोहार... गणेश साधारणत: चाळिशीकडे झुकणारा तरुण...घरची परिस्थिती बेताची... त्यातच कोरोना महामारीचा फटका...
सर्वसामान्यांसारखाच गणेशच्या कुटुंबालाही याचा फटका बसला... शेतीची लाकडी औजारे बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला. कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा, असा प्रश्न समोर असतानाच गणेशने आपल्या कलेला वेगळी वाट निर्माण करून देत छोट्या बैलगाड्या तयार केल्या. आधुनिकतेची जोड देत या बैलगाड्यांचे छायाचित्र फेसबुक, व्हॉट्सॲप अशा सोशल साइट्सवर व्हायरल केले. बघता बघता त्याच्या या कलेला चांगलीच दाद मिळाली. मोठ्या प्रमाणावर ‘मॅडेल’ बैलगाड्यांची विक्री होऊ लागली. आज जिद्द आणि मेहनतीच्या बळावर गणेशने आपल्या कुटुंबाला या संकटातून सावरले आहे.
हेपण वाचा- एसी दुरुस्ती करतांना रेल्वे रुग्णालयात गॅस सिलिंडरचा स्फोट
पारोळ्याच्या राजीव गांधी नगरात राहणाऱ्या तुळशीराम लोहार यांचा बैलगाडी, वखर, पांभर, देवघर, लाकडी नक्षीकाम केलेल्या वस्तू तयार करण्याचा परंपरागत व्यवसाय. ते पूर्वी लाकडी बैलगाड्या मोठ्या प्रमाणात तयार करून देत असत. परंतु काळानुरूप हा व्यवसाय मंदावला. गणेशने कसेबसे शिक्षण पूर्ण झाले. पण, नोकरीचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. हताश न होता गणेशने वडिलोपार्जित व्यवसायाला हातभार लावायला सुरवात केली. त्याने सुरवातीला काही मोठ्या बैलगाड्या तयार केल्या. मात्र, ट्रॅक्टरमुळे त्याची विक्री कमी झाल्याने प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्याने शक्कल लढवत हुबेहूब छोट्या बैलगाड्या तयार केल्या. याशिवाय त्याने पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत फेसबुक, व्हॉट्सॲप यांसारख्या साइट्सवर तयार केलेल्या बैलगाड्यांची छायाचित्रे टाकली.
आधुनिकतेतून चालना
सोशम मीडियाच्या माध्यमातून गणेशच्या कलाकुसरीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. ऑनलाइन ऑर्डर बुक झाल्या. उलट कोरोना काळात व्यवसाय आणखी बहरत गेला. बघता बघता जळगाव, धुळे, नाशिक व पुणे येथील व्यावसायिकांनीही छोट्या बैलगाडींची मागणी केली. आता महिन्याकाठी १५ ते २० बैलगाड्या विकल्या जातात. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नही वाढले. मागणीनुसार बैलगाडी तयार करून कुरिअर, खासगी किंवा एसटी बसमधून बैलगाड्या संबंधित ग्राहकाकडे पाठविल्या जातात. त्यांच्याकडून ऑनलाइन पेमेंट घेतले जाते. यामुळे गणेश यांना महिन्याकाठी किमान ४० ते ४५ हजार रूपये मिळत आहेत.
क्लिक करा - जळगावातील प्रमुख आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी
उत्तर, पश्चिम महाराष्ट्रात पसंती
कोरीव, आखीव तसेच मोठ्या बैलगाड्यांसारखी हुबेहूब कलाकृती गणेश तयार करीत असल्याने शहरातच नाही, तर उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातून चांगली पसंती मिळत आहे. अनेक व्यापारी, राजकीय नेते, मोठमोठ्या व्यावसायिकांनी आपल्या कार्यालयांत, दालना ही कलाकृती ठेवली असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तर काही जण विवाहात रुखवत म्हणूनदेखील मुलीच्या सासरच्या मंडळींना भेट देत असल्याचे गणेशने सांगितले.
संपादन ः राजेश सोनवणे