शेतकऱ्यांच्या आशेवर पुन्हा फिरले पाणी; अवकाळीमुळे रब्बी पिके जमिनीखाली

संजय पाटील
Friday, 8 January 2021

खरिप हंगामात कोरोनाचा प्रभाव असताना रब्बी हंगामात चांगले उत्पन्न घेता येईल या आशेने शेतकऱ्यांनी गहु, हरभरा, ज्वारी व भुईमुग पिके पेरली. चांगली मशागत करित पिकांची वाढ होत असतानाच

पारोळा (जळगाव) : गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील पाचही मंडळासह शहरात ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी (ता. ७) रात्री ८ ते ११ दरम्यान झालेल्या तासाभराच्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डौलाने उभे असलेले गव्हाचे पिक जमिनीखाली गेले असून यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. 
नगांव परिसरातील शेतकरी विनोद पाटील, भास्कर पाटील,अनिल पाटील, प्रशांत पाटील, कैलास पाटील, रमेश पाटील, संतोष पाटील यांच्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या अवकाळी पावसामुळे पिके गळुन पडली आहे. खरिप हंगामात कोरोनाचा प्रभाव असताना रब्बी हंगामात चांगले उत्पन्न घेता येईल या आशेने शेतकऱ्यांनी गहु, हरभरा, ज्वारी व भुईमुग पिके पेरली. चांगली मशागत करित पिकांची वाढ होत असतानाच अवकाळी पावसाच्या लहरीपणामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. लोणी बु, लोणीसीम, लोणी खु, मोरफळ, मंगरुळ, बाहुटे, मोंढाळे, दळवेल या परिसरात देखील अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना झाला आहे. मंगरुळ गणातील नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य प्रमोद जाधव यांनी केली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news parola untimely rain farmer rabbi hangam loss