ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले; पण घाबरू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 December 2020

आधीच्या पावसाळी वातावरणानंतर काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी-जास्त होत असून, वातावरणात मोठ्या प्रमाणात गारव्यासह उष्णताही निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गेल्या पाच - सात दिवसांपूर्वी परिसरातील थंडी अचानक गायब झालेली होती व वातावरण गरम व उबदार बनले होते.

जामनेर (जळगाव) : तालुक्यात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून, वातावरणात बदल होत असल्यामुळे सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक घरांमध्ये किमान सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली असून, कोरोना परत येतो की काय, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 
आधीच्या पावसाळी वातावरणानंतर काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी-जास्त होत असून, वातावरणात मोठ्या प्रमाणात गारव्यासह उष्णताही निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गेल्या पाच - सात दिवसांपूर्वी परिसरातील थंडी अचानक गायब झालेली होती व वातावरण गरम व उबदार बनले होते. त्यानंतरच्या काळात थंडीने अचानक जोर घेतल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. अनेक घरांघरामध्ये सर्दी, खोकला व इतर ताप सदृश आजारांचे रुग्ण आढळून आलेले आहे. हे रुग्ण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात, गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात उपचार करीत आहेत. 

संसर्ग आटोक्‍यात पण..
शहरासह ग्रामीण भागात अधूनमधून टायफाईड, मलेरिया व सदृश आजारांचे रुग्ण आढळून येते आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. मात्र, आता या थंडीच्या काळात जर नागरिकांनी योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. नागरिक बिनधास्त विनामास्क बाहेर फिरताना दिसत आहेत. ही बाब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार धोकेदायक बनली आहे. तेव्हा नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

काय करावे? 
सर्दी अथवा खोकला झालेल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना झाला आहे, असे नव्हे, तर त्यांनी स्वत:ची प्रवासाची हिस्ट्री तपासणे गरजेचे आहे. कुटुंबातील कोणी व्यक्ती बाहेर कुठून येते? कुठे जाते? यावरही विचार करून त्या संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे? सर्दी खोकल्याच त्रास जाणवत असेल अन् तापाची लक्षणे जाणवत असतील तर त्या संदर्भात पुढील उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घाबरू नये. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news patients with fever cough increased