esakal | कागदपत्रे तपासणीसाठी ‘पोलिस आपल्या दारी’
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon police

कागदपत्रे तपासणीसाठी ‘पोलिस आपल्या दारी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : वाहनचोऱ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे विनाकागदपत्रे चोरीचे वाहन बाळगणारेही कमी नाहीत; परिणामी जिल्‍हा पोलिस दलाने नामी शक्कल लढवली असून, स्लम एरिया, भंगार व्यावसायिकांचे गुदाम आणि नागरीवस्त्यांमध्ये सुस्थित असणारे आणि बंदावस्थेतील वाहनांच्या कागदपत्रांची अचानक तपासणी केली. एकट्या एमआयडीसी पोलिसांनी तांबापुरा परिसरातून तेरा वाहने ताब्यात घेतली असून, ‘कागदपत्रे आणा, वाहन घेऊन जा’, असा संदेश वाहन बाळगणाऱ्यांना देण्यात आला.

जळगाव जिल्ह्यासह शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात शहरातील सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दिवसाला प्रत्येकी एक, अशा प्रमाणात वाहनचोरीच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशान्वये शनिवारी (ता. १७) सकाळी सातपासून अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह संबंधित पोलिस ठाण्यांचे प्रभारी डीबी पथकांनी नागरीवस्त्यांमध्ये जात वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी केली. कागदपत्रे नसणाऱ्या वाहनधारकांकडून वाहन ताब्यात घेत ते पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले.

विशेष पथके करणार तपासणी

शहरातील कांचननगर, तांबापुरा, गेंदालाल मिल, पिंप्राळा हुडको, शिवाजीनगर हुडको, शनीपेठ परिसर, मास्टर कॉलनी, सुप्रीम कॉलनी यांसह आदी भागात ही कारवाई केली आहे. सकाळी सहापासून नेमलेल्या सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद भागात जाऊन वाहनांची तपासणी केली. आज सकाळी सहा पथक तयार आहे. यात दहा अधिकारी असून, १२५ कर्मचारी यांचा समावेश आहे. प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात असून, संशयास्पद वाहनाधारकांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.