जिल्‍ह्‍यात पावणे चार लाख बालकांना पोलिओ लसीकरण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

जिल्ह्यातील एकही मुल वंचित राहणार नाही. याकरीता आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करावे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अन्य विभागांनी आरोग्य विभागास आवश्यक ते सहकार्य करावे.

जळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारीस होणार आहे. ग्रामीण भागातील ३ लाख ७२ हजार १६४ बालकांना लस देण्यासाठी २ हजार ६५४ बुथ उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही मुल वंचित राहणार नाही. याकरीता आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करावे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अन्य विभागांनी आरोग्य विभागास आवश्यक ते सहकार्य करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्यात. 
राष्ट्रीय पल्स पोलीस लसीकरण मोहिमेंतर्गत ३१ जानेवारीस आरोग्य विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. याबाबत आवश्यक ते नियोजनासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वये समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, भीमाशंकर जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) दिलीप पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तडवी, डॉ. रावलाणी, डॉ. किरण सोनटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांच्यासह आरोग्य विभागासह इतर विभागांचे अधिकारी, समिती सदस्य उपस्थित होते. 

मोहिम प्रभावी राबविण्याच्या सुचना
मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओचा डोस देवून पोलिओ डोसचे शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्ण करावे. पल्स पोलिओ लसीकरणाचे काम हे राष्ट्रीय कर्तव्याचा भाग समजून या मोहिमेत आरोग्य विभागासोबतच इतर विभागानीही सहकार्य करून जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 

एकही बालक सुटणार नाही
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार पल्स पोलिओ लसीकरणापासून जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकही बाळ वंचित राहू नये यासाठी घरोघरी जावून पल्स पोलिओची लस देण्याबराबरच एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजार, यात्रा, खाजगी वाहतुक स्थानक, मजूर वस्तीच्या ठिकाणी, अती जोखीमीची ठिकाणे अशा वर्दळीच्या ठिकाणी लसीकरणासाठी बुथ उभारून मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यात येईल असे सांगितले. झोपडपट्टी भागातील बालकांसाठी बुथ शिवाय दुसऱ्या दिवसांपासून घरोघरी जावून लस देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news polio vaccination 31st janvary collector abhijit raut