ठाकरे- खडसेंमधील संवादातून फोडाफोडीला प्रारंभ अन्‌ घडले सत्‍तांतर नाट्य

eknath khadse udhav thackeray
eknath khadse udhav thackeray

जळगाव : पंधरा दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याच्या संदर्भातील विषयांबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला. त्यात जळगाव शहराशी संबंधित विषयातून अडीच वर्षांनंतरच्या महापौर निवडीचा मुद्दा उपस्थित झाला आणि तेव्हापासून संभाव्य सत्तांतरनाट्याला प्रारंभ झाल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. 
महापालिकेत भाजपकडे ५७ नगरसेवकांचे पाठबळ असताना महापौर निवडीच्या ऐनवेळी काही नगरसेवकांनी बंड पुकारून शिवसेनेची वाट धरल्याचे चित्र सध्या दिसतेय. मात्र, या सर्व नाट्याचा मुख्य करविता कोण, याबाबत अद्यापही नेमकी माहिती समोर आलेली नसून जो-तो आपापल्या परीने त्यामागच्या सूत्रधारांचा शोध घेतोय. 

ठाकरे-खडसे संवाद 
मात्र, या नाट्यातून आणखी एक माहिती समोर येत आहे. साधारण दहा-बारा दिवसांपूर्वी माजी मंत्री खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील काही कामांच्या संदर्भात संपर्क केला. त्या विषयांमध्ये जळगाव महापालिकेतील विकासकामांचा विषय निघाला असता, खडसेंनी शहराकडे लक्ष देण्याची विनंती केली. ठाकरे यांनी जळगाव महापालिकेच्या निवडणुकीबद्दल विचारले असता, निवडणुकीला अद्याप अडीच वर्षे बाकी असून, आता पंधरा दिवसांनी महापौर निवडप्रक्रिया असल्याचे लक्षात आणून दिले. त्या संवादातून या महापौर निवडीत काही करता येऊ शकते का, हा विचार पुढे आला.. आणि सूत्रे हलू लागली. 

नगरसेवक खडसे दरबारी 
अर्थात, खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यापासूनच शिवसेनेचे व भाजपतील काही नगरसेवक खडसेंच्या दरबारी सातत्याने हजेरी लावत होते. आताही १५ दिवस आधीच काही नगरसेवक खडसेंना भेटून गेले होते व त्यांनी भाजपची साथ सोडण्याची भूमिका मांडली होती. ही माहिती खडसेंनी ठाकरेंना दिली. शिवसेनेचा महापौर होऊ शकतो, मी मदत करतो, अशी भूमिकाही मांडली. ठाकरेंनी खडसेंना विनायक राऊत, एकनाथ शिंदे यांच्याशी बोला व ठरवा, असा सल्ला दिला. 

मग शिवसेना नेत्यांचा पुढाकार 
तेव्हापासून शिंदे, राऊत यांनी या कामात पुढाकार घेतला. पालकमंत्र्यांनाही काल-परवापर्यंत याबाबत माहिती नव्हती, असेही समोर आलेय. अखेरीस नगरसेवक हमखास सोबत येणार असल्याचे चित्र निर्माण झाले व त्यांना पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पुढे रवाना करण्यात आले. परवापर्यंत ललित कोल्हे भाजपसोबत असताना त्यांची माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानींशी भेट झाली आणि त्यांनीही भाजपची साथ सोडण्यास सहमती दर्शवत शिवसेनेकडे कूच केले, अशी माहितीही समोर येत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com