
आमदार रोहित पवार पाचोरा, शेंदुर्णी, नेरीमार्गे जळगावला आले. दुपारी साडेतीनला येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार होता. तब्बल तीन तास उशिरा आल्याने सायंकाळी सहाला ते कार्यालयात आले.
जळगाव : कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार रविवारी (ता. २४) जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मेळाव्यासाठी आले असताना त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला.
आमदार रोहित पवार पाचोरा, शेंदुर्णी, नेरीमार्गे जळगावला आले. दुपारी साडेतीनला येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार होता. तब्बल तीन तास उशिरा आल्याने सायंकाळी सहाला ते कार्यालयात आले. स्वागतासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांची प्रतीक्षा करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, गफ्फार मलीक, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोंधळातच मनोगताला सुरवात
आमदार रोहित पवार कार्यक्रमस्थळी येताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली. अनेक वेळा जाहीर करूनही कार्यकर्ते बसण्यास तयार नव्हते. या गोंधळातच त्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमदार पवार यांनी मनोगत व्यक्त केले. ते जाण्यास निघाले, त्या वेळीही कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
धक्काबुक्की अन् सेल्फीची चढाओढ
कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांनाही धक्काबुक्की केली. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी, तसेच त्यांना हार देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली. प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांच्या गर्दीत रोहित पवार अक्षरश: दाबले गेले. ‘मलाच अवघड झालय’, असे शब्दही या गर्दीत त्यांच्या तोंडून बाहेर पडले. काही कार्यकर्त्यांनी साखळी करीत त्यांना अक्षरश: त्यांच्या वाहनाजवळ आणले आहे. त्याठिकाणी कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत ते वाहनात बसून दुसऱ्या कार्यक्रमास्थळी रवाना झाले.
संपादन ः राजेश सोनवणे